८ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |8 November 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ नोव्हेंबर चालू घडामोडी

मॅक्सवेलआधी ‘या’ धडाकेबाज फलंदाजांनी वर्डकपमध्ये द्विशतक ठोकलंय

 • ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करत अविश्वसनीय द्विशतक ठोकले. या द्विशतकासह त्याने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ७ बाद ९१ अशा बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं आणि ७ बाद २९३ पर्यंत मजल मारली. यापैकी २०१ धावा त्याने एकट्याने काढल्या. एक पाय जखमी असतानाही त्याने मोठा लढा देत संघासाठी विजयश्री खेचून आणली. या विजयासह मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तसेच विश्वचषक स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मॅक्सवेलने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील मोठा विक्रमही मोडित काढला.
 • मॅक्सवेलने या सामन्यात १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावा फटकावल्या. या द्विशतकासह त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे. मॅक्सवेलआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल या दोन धडाकेबाज फलंदाजांच्या नावावर आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम गप्टीलच्या नावावर आहे.
 • ख्रिस गेल हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा जगातला पहिला खेळाडू आहे. त्याने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरोधात ही कामगिरी केली होती. गेलने १४७ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीने २१५ धावा फटकावल्या होत्या. त्याच विश्वचषक स्पर्धेत जगाला आणखी एक द्विशतकवीर मिळाला. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने वेस्ट इंडिजविरोधात द्विशतक ठोकलं होतं. गुप्टीलने १६३ चेंडूत २४ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने तब्बल २३७ धावा फटकावल्या होत्या. त्याने गेलचा २१५ धावांचा विक्रमही मोडला.

खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा

 • मॅक्सवेलने गुप्टिल किंवा गेलचा विक्रम मोडला नसला तरी त्याची खेळी या दोघांपेक्षा श्रेष्ठ ठरते, कारण खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने हे द्विशतक ठोकलं आहे. गुप्टिल आणि गेल हे दोघेही सलामीवीर होते. तर मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारताच्या कपिल देव यांनी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अशीच खेळी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली. त्याचीच पुनरावृत्ती ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी मुंबईत केली. मॅक्सवेलने कपिल देव यांचा नाबाद १७५ धावांचा विक्रम या खेळीद्वारे मोडला.

‘अल्प युद्धविरामा’चा विचार करण्यास तयार; इस्रायलच्या पंतप्रधानांची भूमिका

 • हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये ‘अल्प विराम’ घेण्यास तयार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उशिरा स्पष्ट केले. हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्यासाठी अल्प विराम घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
 • गाझामधील पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम घ्यावा असे आवाहन केले जात आहे, पण नेतान्याहू यांनी त्यास नकार दिला होता. हमासने सर्व ओलिसांची सुटका केल्याशिवाय कोणताही युद्धविराम घेणार नाही अशी भूमिका इस्रायलकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाली असून त्यामुळे उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 • हमासबरोबरचे युद्ध संपल्यानंतर गाझामधील एकंदर सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवरच असेल असे नेतान्याहू यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे इस्रायल गाझा पट्टीमधून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
 • या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये इंधनाचा पुरवठा झाला नाही तर सर्व सेवा कोलमडून पडतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाकडून देण्यात आला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे.

भारतातील वन्यजीव संशोधकांनी शोधली रंगीत पाल

 • भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामीळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल त्यांना आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते. साधारणपणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागातील घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते. या जंगलात अनेक लहानमोठे हिंस्त्र प्राणी आहेत. येथे राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे झाडाखाली राहात जेवढे सामान सोबत नेले, तेवढ्यावरच संशोधकांनी गुजराण केली.
 • २०१५ ला अमित सैय्यद व त्यांच्या चमुला यश आले आणि ही पाल सापडली. त्यानंतर या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून त्याच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा व जनुकीय अभ्यास अमितने सुरू केला. शास्त्रीय अभ्यासातून नक्की झाले की ही पाल नवीन असुन वन्यजीवशास्त्रात याची अजूनही नोंद नाही. अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे ठरवले. प्रो. रशीद सैय्यद हे अमितचे वडील असून ‘निमाम्स्पिस रशिदी’ असे या पालीचे नाव ठेवण्यात आले.
 • नुकतेच या पालीवरील संशोधन ‘एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले.‘निमास्पिस रशिदी’ ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंग छटांमुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते. या संशोधनामध्ये अमित सैय्यद, सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, आयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.

इब्राहिम जादरानने झुंजार शतक! विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू

 • अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात इब्राहिमने १३१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. त्याच वेळी, इब्राहिम एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. याआधी, अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी समिउल्लाह शिनवारीची होती, त्याने २०१५ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 96 धावांची खेळी केली होती. इब्राहिमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४३ चेंडूत १२९ धावांची नाबाद खेळी खेळली.

अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

 • १२९* – इब्राहिम जादरान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
 • ९६ – समिउल्ला शिनवारी विरुद्ध स्कॉटलंड, ड्युनेडिन, २०१५
 • ८७ – इब्राहिम झद्रान विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई, २०२३
 • ८६ – इकराम अलीखिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लीड्स, २०१९
 • ८० – हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध भारत, दिल्ली, २०२३
 • ८० – रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, २०२३

अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके

 • ६- मोहम्मद शहजाद
 • ५ – रहमानउल्ला गुरबाज
 • ५- रहमत शाह
 • ५ – इब्राहिम जादरान

एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू

 • २० वर्षे १९६ दिवस: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड, कोलकाता, २०११
 • २१ वर्षे ७६ दिवस: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध वेस्ट इंडिज, जयपूर, १९९६
 • २१ वर्षे ८७ दिवस: अविष्का फर्नांडो (श्रीलंका) विरुद्ध वेस्ट इंडीज, चेस्टर-ले-स्ट्रीट, २०१९
 • २१ वर्षे ३३०: इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
 • २२ वर्षे १०६ दिवस: विराट कोहली (भारत) विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०११
 • २२ वर्षे ३०० दिवस: सचिन तेंडुलकर (भारत) विरुद्ध केनिया, कटक, १९९६.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.