२३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२३ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |23 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ सप्टेंबर चालू घडामोडी

आशियाई क्रीडा स्पर्धाना आजपासून प्रारंभ; भारताचे शंभरी पार करण्याचे लक्ष्य!

  • करोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धाना आज, शनिवारपासून अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. अर्थात, काही क्रीडा प्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाल्यामुळे उद्घाटन सोहळा हेच आजच्या दिवसाचे खास आकर्षण असेल. भारताचे यंदाच्या स्पर्धेत आशियाई स्तरावरील आपली ताकद दाखवून देण्याचे लक्ष्य असेल.
  • ‘इस बार सौ पार’ अशा घोषवाक्यासह भारताचे पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. यंदा भारताने आजवरचे आपले सर्वात मोठे ६५५ खेळाडूंचे पथक आशियाई स्पर्धेसाठी पाठवले आहे. इंडोनेशियात २०१८ मध्ये झालेल्या गेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ७० (१६ सुवर्ण, २३ रौप्य, ३१ कांस्य) पदकांची कमाई केली होती. या वेळी हा आकडा शंभरी गाठणार असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. स्पर्धेत ४० क्रीडा प्रकारांचा समावेश असला तरी भारत ३९ क्रीडा प्रकारांत सहभाग घेणार आहे.
  • कोरियात १९८६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला होता. मात्र, त्यानंतर भारत पहिल्या पाचात येऊ शकलेला नाही. हे चित्र या वेळी बदलण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेहमीच अ‍ॅथलेटिक्स आणि कुस्तीने भारताची पदके वाढवली आहेत. या वेळीही अ‍ॅथलेटिक्समध्ये निश्चित आशा आहेत, पण कुस्तीमधील पदकांबाबत कमालीची धाकधूक आहे. जागतिक स्पर्धेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर मल्ल सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यावर वेगळेच दडपण असेल.
  • भारताची ‘या’ खेळाडूंवर भिस्त
  • * नीरज चोप्रा (भालाफेक), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पी. व्ही. सिंधू (बॅडिमटन), बजरंग पुनिया (कुस्ती), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) या ऑलिम्पिक पदक विजेत्यांकडून अपेक्षा.
  • * अविनाश साबळे (३ हजार मीटर स्टीपलचेस), एच. एस. प्रणॉय (बॅडिमटन), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी (तिरंदाजी), निखत झरीन (बॉक्सिंग), पुरुष व महिला क्रिकेट संघ, पुरुष व महिला कबड्डी संघ, पुरुष व महिला हॉकी संघ हे यंदा सुवर्णपदकाच्या शर्यतीत. टेनिसमध्ये अनुभवी रोहन बोपण्णामुळे पदकाची आशा. नेमबाजांकडेही लक्ष.

कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती

  • शाळेतील कमी पटसंख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी, कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण न होणे अशी कारणे देत राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाव तिथे शाळा या संकल्पनेला आता छेद जाणार असून, समूह शाळांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. शिक्षकांची खासगी कंपन्यांमार्फत कंत्राटी भरती, खासगी कंपन्यांकडून सीएसआर निधी घेऊन त्यांची नावे शाळांना देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयावर आधीच टीकेची झोड उठली आहे. त्या पाठोपाठ आता समूह शाळांचा विषय पुढे आला आहे.
  • शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ हजार ७०७ शिक्षक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून, समूह शाळा निर्माण करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.
  • या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी समूह शाळा विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील तोरमाळ, तर पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे निर्माण करण्यात आलेल्या समूह शाळांच्या धर्तीवर राज्यात समूह शाळा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समूह शाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण, इतर अभ्यासगटांनी दर्जेदार शिक्षणासाठी सुचवलेल्या १८ पायाभूत सुविधा, पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येक विषयासाठी त्या विषयाचे विषय तज्ञ शिक्षक उपलब्ध असतील याबरोबर संगणक खेळ व इतर कला यासाठी स्वतंत्र शिक्षक, प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्ग खोली, त्याचबरोबर वाचनालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, विविध कला संगीत यांसाठी बहुउद्देशीय कक्ष, खेळाचे मैदान-साहित्य, विद्यार्थी वाहतुकीसाठी बससेवा उपलब्ध करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
  • राज्य शासनाचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करणारा आहे. समूह शाळेमुळे विद्यार्थ्याना त्यांच्या घरापासून १ किंवा ३ किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे.

या गावात आहेत २१ पुरातन गणेशमूर्ती

  • हिंदू, बौध्द, जैन अशा विविध धर्मांशी हजारो वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या तगर म्हणजेच आजच्या तेर गावचा इतिहास थक्क करणारा आहे. या परिसरात शैव, वैष्णव, शाक्य सांप्रदायाचे केवळ अस्तित्वच नाही, तर त्यांचे इथे प्राबल्यही होते. अगदी तसेच गाणपत्य म्हणजेच गणपतीला इश्टदेव मानणारा वर्गही हजारो वर्षांपासून इथे वास्तव्यास होता. त्यामुळेच २१ पुरातन गणेशमूर्ती आजही गतकाळातील समृध्द वारशाचा सप्रमाण पुरावा देत आहे. महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे २१ पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत.
  • तेर येथे झालेल्या उत्खननात काही नाणी अशीही आढळून आली आहेत, ज्यावर गणपतीचे अंकन करण्यात आले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या दगडांमधून निर्माण करण्यात आलेल्या अनेक गणेशमूर्ती तेरच्या उत्खननातून समोर आल्या आहेत. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. आकाराने लहान परंतु कलाकुसरीच्या दृष्टिने अत्यंत आकर्षक असलेल्या या मूर्तींकडे पाहताना प्राचीन काळातील गणेशपूजकांची दृष्टी स्पष्ट होते. पाषाणातून निर्माण केलेली शाईची दाऊत आणि त्यावर कोरलेली गणेशमूर्ती लक्षवेधी अशी आहे.
  • वरील मूर्तीव्यतिरिक्त या शासकीय वस्तुसंग्रहालयात मोरावर आरूढ असणारा गजानन हातामध्ये कमळकळी, डमरू व त्याचा आवडता मोदक घेवून बसला आहे. उत्तर यादवकालीन मानल्या जाणार्‍या गणेशमूर्तीच्या मस्तकावरील मुकुट, गळ्यातील हार, पायातील तोडे, कंकण, मेखला आणि अंगावरचे यज्ञोपवितही लक्षवेधी पध्दतीने कोरले आहे. मोदकाना सोंडेने स्पर्श करणारा हा गजवदन शहाबादी दगडापासून कोरण्यात आला आहे.
  • या व्यतिरिक्त तेरमधील विविध मंदिरात विविध काळातील गणनायकाच्या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत. मेंडेश्वराच्या पाठीमागे असलेले शिल्प, तुंगेश्वर मंदिरातील गणपती, कणकेश्वर महादेवाच्या मागील वरदविनायक, पुरातन नरसिंह मंदिरातील सभामंडपातील लंबोदर गजानन, गौरीचे रूप असणार्‍या तेरमधील अंबिका मंदिरात असलेला विनायक, देवीचे उग्र रूप धारण केलेल्या चामुंडेच्या मंदिरातील गजाननाची सुरेख मूर्ती, सिध्देश्वर मंदिराच्या गाभार्‍यातील द्वार शाखेवर अपवादानेच आढळून येणारी गणेशमूर्ती आणि कालेश्वराच्या शिवालयात सभामंडपात असलेल्या अप्रतिम गणेशमूर्तीचे दर्शन घेताच भाविकांना मोठे समाधान लाभते.

केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४ टक्के महिला; न्यायालय, पोलिस दल आणि इतर क्षेत्रात प्रमाण किती?

१. केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४.५ टक्के महिला

  • पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ ही देशातील महत्त्वाचे निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व नेहमीच कमी राहिले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये महिला मंत्र्यांमध्ये केवळ किरकोळ वाढ झाली. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” या वार्षिक अहवालानुसार, १ जानेवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांचे प्रमाण १४.४७ होते. एकूण ७६ मंत्र्यामध्ये ११ महिला मंत्री आहेत. दोन महिलांकडे कॅबिनेट आणि नऊ महिलांकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मागच्या वीस वर्षात महिलांचा मंत्रिमंडळातला सहभाग फक्त १२ टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये काँग्रेसप्रणीत युपीए आणि भाजपप्रणीत एनडीए अशा दोन्ही सरकारांचा समावेश आहे.

२. सर्वोच्च न्यायालयात १० टक्के, उच्च न्यायालयात ३३ टक्के

  • सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्येही महिलांचे प्रमाण कमी आहे. “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार २९ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या २९ न्यायाधीशांपैकी फक्त तीनच महिला न्यायाधीश होत्या. तसेच उच्च न्यायालांमध्येही महिला न्यायाधीशांचे प्रमाण कमी आहे. मणिपूर, मेघालय, पटना, त्रिपुरा आणि उत्तराखंड राज्यातील उच्च न्यायालयातील महिलांची संख्या शून्य आहे. तर सिक्किममध्ये ३३.३३ टक्के प्रमाण आहे.

३. व्यवस्थापकीय पदांवर महिलांची त्रोटक संख्या

  • “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार, २०२१ साली व्यवस्थापकीय पदांवर काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण १८ टक्के एवढे आहे. व्यवस्थापकीय पदावर काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिलांचे सर्वाधिक प्रमाण मिझोराम (४०.८ टक्के) राज्यात आहे. दादरा आणि नगर हवेली (१.८ टक्के) या केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी प्रमाण आहे.
  • मिझोराम, सिक्कीम, मेघालय, आंध्र प्रदेश, मणिपूर, कर्नाटक, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, गोवा, केरळ, ओडिशा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत व्यवस्थापकीय पदांवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा (१८ टक्के) जास्त आहे.
  • तसेच उर्वरीत तेलंगणा, त्रिपुरा, महाराष्ट्र, चंदीगड, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, छत्तिसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, पंजाब, बिहार, अंदमान आणि निकोबार बेट, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आणि दादरा व नगर हवेली या १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी महिला कर्मचारी व्यवस्थापकीय पदावर असल्याचे दिसून आले आहे.

४. फक्त आठ टक्के महिला पोलिस अधिकारी

  • “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार, भारतातील विविध राज्यातील पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण केवळ ८.२१ टक्के एवढेच आहे. १ जानेवारी २०२१ रोजी नोंद केल्यानुसार केंद्र आणि राज्यातील पोलिस दलामध्ये कार्यरत कर्मचारी संख्या ३०,५०,२३९ एवढी होती. त्यापैकी महिला पोलिसांची संख्या फक्त २,५०,४७४ (८.२१ टक्के) एवढीच होती. नागरी पोलिस, जिल्हा सशस्त्र राखीव पोलिस, विशेष शसस्त्र पोलिस बटालियन, भारतीय राखीव बटालियन पोलिस, आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय कारखानदारी सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय सिक्युरीटी गार्ड, रेल्वे सुरक्षा दल आणि सशस्त्र सीम दल अशा विविध विभागांमध्ये महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

५. बँकेत चार पैकी एक महिला कर्मचारी

बँकेमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या इतर अनेक क्षेत्रांपेक्षा जास्त आहे. “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार, शेड्यूल्ड व्यापारी बँकातील १६,४२,८०४ कर्मचाऱ्यांपैकी महिलांची संख्या एक चतुर्थांश म्हणजेच ३,९७,००५ एवढी (२४.१७) टक्के आहे. बँकेतील अधिकारी, कारकून आणि सहकारी अशा विविध पदांवर महिला काम करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (२२ सप्टेंबर) सुरुवात झाली. टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार के.एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.४ षटकात २८१ धावा करत सामना जिंकला. या विजयासह भारत आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो आधीच टी२० आणि कसोटीत अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनला आहे.
  • के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. २०१४ मध्ये तो एकाच वेळी कसोटी, वन डे आणि टी२० मध्ये पहिल्या क्रमांकावर होता. भारताने ही कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहेत.
  • जय शाह म्हणाले की, “हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल #TeamIndia चे हार्दिक अभिनंदन. या संघाने मैदानावर शानदार कामगिरी केली आहे. या यशाचा पाठलाग करताना घेतलेली मेहनत ही क्रमवारी दर्शवते. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने ही विलक्षण कामगिरी केली आहे.” नुकताच आशिया चषक जिंकून आलेल्या भारताला सूर्यकुमार यादव फॉर्मात आल्याने मोठा दिलासा मिळाला. या विजयासह टीम इंडियाने वन डे क्रमवारीत नंबर १चा किताब मिळवला. ११६ रेटींग पॉईंटसह टीम इंडिया आता अव्वल स्थानी आहे आणि त्यांनी पाकिस्तानला (११५) दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

सामन्यात काय झाले?

  • तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ५२, जोश इंग्लिसने ४५ आणि स्टीव्ह स्मिथने ४१ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.