अभिनव भारत

‘ब्रिटिश पारतंत्र्यापासून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हेच साधन’हे ब्रीद मनात धरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०४ मध्ये स्थापन केलेली क्रांतिकारी संस्था.

हे ध्येय साध्य करण्यासाठी १८९९ मध्येच सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रभक्तसमूह’ नावाची गुप्त संस्था स्थापन केली व तिला पोषक म्हणून १९०० च्या प्रारंभी‘मित्रमेळा’ ह्या नावाची उघड कार्य करणारी एक संस्था काढण्यात आली.

शिवजयंती, गणेशोत्सव इ. सार्वजनिक उत्सवांतून देशभक्तिपर पद्ये म्हणून जनजागृतीचे कार्य सुरू झाले.

मिरवणुका, सभा, मेळे वगैरे प्रचारसाधनांच्या द्वारे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुःसूत्रीचा प्रचार करण्यात येऊ लागला.

पुढे १९०४ मध्ये सावरकरांनी मित्रमेळ्याचे ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत रूपांतर केले.

मॅझिनीच्या ‘यंग इटली’ या संघटनेच्या धर्तीवर ह्या संस्थेची संघटना करण्यात आली. देशाच्या इतर भागांतील क्रांतिकारी संस्थांशीही संपर्क साधण्यात आला.

१९०६ साली सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्‍लंडला गेले व तेथूनच अभिनव भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ झाला.

इंग्‍लंडमध्ये सावरकर जेथे राहत होते, ते ‘भारत भवन’ ह्या चळवळीचे केंद्र बनले.

भारतातून इंग्‍लंडमध्ये येणारे तरुण विद्यार्थी भारत भवनाकडे आकर्षित होऊ लागले.

सशस्त्र क्रांतिसाठी आवश्यक असलेले शस्त्रनिर्मितीचे शास्त्रीय ज्ञान निरनिराळ्या देशांतील क्रांतिकारकांशी संपर्क साधून मिळविण्याचा प्रयत्‍न करण्यात आला व भिन्न भिन्न मार्गांनी भारतात पिस्तुलेही पाठवण्यात येऊ लागली

सावरकर इंग्‍लंडमध्ये असताना १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे बंधू बाबाराव ह्यांच्यावर त्यांच्या देशभक्तिपर पद्यांबद्दल बंड करण्याचा आरोप ठेवून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली. त्यामुळे तरुण पिढीत सूडाची भावना निर्माण झाली.

इंग्‍लंडमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी केलेला कर्झन वायली ह्याचा खून व नासिक येथे कलेक्टर जॅक्सन ह्याचा कान्हेरे यांनी केलेला खून, हे ह्या सूडाच्या भावनेमुळेच झाले.

नासिकच्या खुनाच्या मागे कट असून त्यात सावरकर आहेत असे ठरवून सरकारने त्यांना इंग्‍लंडमध्ये पकडले व भारतात आणल्यावर त्यांना दोन जन्मठेपांची म्हणजे पन्नास वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर अभिनव भारताचे प्रकट कार्य बंद पडले.

‘अभिनव भारत’ ह्या संस्थेचे औपचारिक विसर्जन करण्यात यावे असे सावरकरांनी ठरविलेत्यास अनुसरून मे १९५२ मध्ये पुण्यास स्वातंत्र्ययुद्धातील सर्व हुतात्मांच्या स्मरणार्थ क्रांतिस्तंभ उभारण्यात आला.

नासिक येथे ज्या घरात १९०४ मध्ये अभिनव भारताची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती, त्या घरावर मे १९५३ मध्ये सावरकरांच्या हस्ते स्मृतिशिला बसविण्यात आली व संस्थेचे विसर्जन करण्यात आले.

अभिनव भारताचे स्वातंत्र्यवीर सावरकर प्राण होते. संस्थेच्या कार्यात त्यांना अनेक देशभक्तांचे साहाय्य लाभले. त्यात त्यांचे बंधू बाबाराव, पं. श्यामजीकृष्ण वर्मा, श्रीमती कामा, लाला हरदयाळ, भाई परमानंद, मदनलाल धिंग्रा, ग्यानचंद वर्मा, सेनापती बापट, कान्हेरे इ. क्रांतिकारकांचा नामनिर्देश करणे आवश्यक आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.