Natural Geography of Maharashtra
Natural Geography of Maharashtra

bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशियादक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावर विषम हवामान आहे. हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने याच भागातील मृदा तयार होते. (जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक सुपीक जमीन) ज्या भागात जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जातात. कोकणात फळ व भात पिके तर  पठारावर कापूस

म्हणजेच एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते.

प्रस्तरभंग (Geological Fault) :- भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठिण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी

गट पर्वत ( Block Mountain) :- कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काहीवेळा प्रस्तरभंग बाहेरील भाग स्थिर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वेळा व दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग स्थिर राहतो व दोन्ही बाजूंकडील भाग खाली खचतो तेव्हा मधला भाग उंच दिसतो. त्यास गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत

अवशिष्ट पर्वत :- भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात, ते सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात. त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात.

उदा :-सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत

घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे  तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला  घळई म्हणतात.

उदा:- प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली आहे.

घर्षित चबुतरे :- सागरी लाटांच्या समुद्रकड्यांवर सततच्या होणाऱ्या माऱ्यामुळे कड्याच्या पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते व कालांतराने हीकपार खोल होत जाते व काही कालावधीनंतर कपारीवरचाकडा खाली कोसळतो. त्यामुळे समुद्र कड्याचा भाग मूळस्थानापासून मागे सरकतो. ज्या ठिकाणी हा कडा कापला जातो तेथे जी सपाट जागा निर्माण होते त्यास तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात.

उदा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारचे तरंग घर्षित चबुतरे आढळतात

नदीचे खोरे (River Basin) :- प्रमुख नदी तिच्या उपनद्या त्याच्या साहाय्यक नद्या व या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे असंख्य लहान मोठे प्रवाह या सर्वांनी एकत्रितरित्या जलसिंचन केलेला एकूण प्रदेश म्हणजे मुख्य नदीचे खोरे.

खाडी (Estuary) :- नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तेथे नदीच्या मुखामध्ये समुद्राचे पाणी आतपर्यंत शिरते व नदीचे गोड पाणी निमखारे होते. समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागाला खाडी असे म्हणतात.

दंतुर किनारा (Irregular Seashore) :- जेव्हा समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची असते त्या वेळेस ती किनारपट्टी दंतुर आहे असे म्हटले जाते.

उदा:- कोकण किनारपट्टी

रिया किनारा (Riya Seashore):- एखादी समुद्रकिनारपट्टी ही समांतर रित्या नद्यांनी जी पिंजून काढली असेल म्हणजेच एखाद्या समुद्र किनारपट्टीवर जेव्हा येऊन मिळणाऱ्या नद्या सलग रित्या समांतरपणे समुद्रास येऊन मिळतात व ती किनारपट्टी खणून काढतात त्यावेळेस ती किनारपट्टी रिया प्रकारची आहे असे म्हणतात.

उदा. कोकण किनारपट्टी किनारपट्टी

पर्वत (Mountain) :- सभोवतालच्या कमी उंचीच्या प्रदेशाच्या मानाने उंच असलेल्या विस्तीर्ण भूभागास निश्चित स्वरूपाच्या पाया असतो व त्याचे डोंगर-कडे व दर्या स्पष्ट आढळतात. अशा भूभागास पर्वत असे म्हणतात.

पठार (Pleatue) :- पठारे विस्तृत गाभ्याचे उंच प्रदेश सर्व असून सर्वसाधारणपणे सभोवतालच्या प्रदेशाच्या मानाने पठाराची उंची ही सर्वात जास्त असते, त्यास पठार म्हणतात.

घाटमाथा :- सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य शिरोधारेवर असलेला सपाट पठारी प्रदेश याच घाटमाथा असे संबोधतात स्थानिक भाषेत या सडा असे म्हणतात उदा महाबळेश्वर, पाचगणी, कास

मैदान :- अतिशय मंद उतार असलेला व उंच सखलपणाचा अभाव असलेला कमी उंचीचा सपाट प्रदेश म्हणजे मैदान होय.

भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशांपैकी एक असलेल्या दक्षिण भारतीय पठाराचा एक उपविभाग म्हणजेच महाराष्ट्र पठार (दखनचे पठार) महाराष्ट्र होय. 

परंतु महाराष्ट्र राज्य हे वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेमध्ये विभागलेले आहे. जसे महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम पसरलेली सातपुडा पर्वतरांग वसलेली आहे. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला लागून असणाऱ्या अरबी समुद्रामुळे व पश्‍चिम भागात उत्तर-दक्षिण पसरलेल्या उंच पर्वत रांगा सह्याद्रीमुळे ( पश्चिम घाटामुळे) कोकण किनारा (पश्चिम किनारपट्टी) हा एक प्राकृतीक विभाग आहे.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून महाराष्ट्र पठारावर काही उपरांगा विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते.

महाराष्ट्राच्या पाकृतीक सीमा

1)उत्तरेस सातपुडा पर्वत, चिखलदरा डोंगर (गाविलगड टेकड्या), तोरणमाळ चे पठार (अस्तंभा डोंगर)
2)पूर्वेस चिरोल टेकड्या, आहिरी टेकड्या
3)दक्षिणेस ताम्रपर्णी नदी, मांजरा डोंगर, चिकोडी रांगा
4)पश्चिमेस अरबी समुद्र

महाराष्ट्राच्या पाकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

  1. पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:- 

 उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.

लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे. 

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी आहे व सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा ठाणे आहे

कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

उपभाग :-

कुंडलिका नदीखोरे यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागांत विभागली जाते.

उत्तर कोकण:- समाविष्ट जिल्हे:-दक्षिण कोकण:- समाविष्ट जिल्हे:-
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघररत्नागिरी व सिंधुदुर्ग

खलाटी:-

 पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

वलाटी :-

कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.

भूरूपे :-

कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या अरबी समुद्रातील सागरी लाटांचे कार्य सतत चालू असते. त्यामुळे या भागात समुद्रकडे, सागरी गुंफा, चौपाटी, वाळूचे दांडे, चबुतरे अशी अनेक भूरूपे तयार झाली आहेत.  विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अशी तयार झालेली भूरूपे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात.

खाडी:-

नदी आपल्या प्रवासादरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्याठिकाणी नदीचे पाणी समुद्रात जाऊन मिळतेच परंतु त्याच बरोबर समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत शिरत. समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागास खाडी असे म्हणतात. भारतातील पश्चिम किनारपट्टी चे खाडी हे वैशिष्ट्य आहे. खाडीचे पाणी निमखारे असते.

उत्तर कोकणातील खाड्यादक्षिण कोकणातील खड्या :-
पालघर :- डहाणू, दातीवरा, वसई

 

ठाणे :- ठाणे जिल्हा

मुंबई शहर / उपनगर :- मनोरी, मालाड, माहीम

रायगड जिल्हा :- धरमतर, रोहा, पनवेल, राजपुरी, बाणकोट

रत्नागिरी जिल्हा :- केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापुर, विजयदुर्ग (रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर)

 

सिंधुदुर्ग जिल्हा:- देवगड, आचरा, कलावली, कर्ली, तेरेखोल

नदी खाडी जिल्हा
वैतरणादातिवरापालघर
उल्हासवसई पालघर 
पाताळगंगा धरमतर रायगड 
कुंडलिका रोह्याची खाडीरायगड 
सावित्री बाणकोट रायगड 
वाशिष्टी दाभोळ रत्नागिरी 
शास्त्री जयगड रत्नागिरी 
शुक विजयदुर्गरत्नागिरी व सिंधुदुर्ग सीमेवर 
गडकलावलीसिंधुदुर्ग
कर्लीकर्लीसिंधुदुर्ग
तेरेखोलतेरेखोलसिंधुदुर्ग

बंदरे :-

कोकण किनारपट्टी ही दंतुर असल्याने कोकण किनारपट्टीवर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असंख्य नैसर्गिक बंदरे निर्माण झाली आहेत. साधारणतः 49 बंदरे या कोकण किनारपट्टीवर असून मुंबई हे त्यातील प्रमुख बंदर होय. त्याचबरोबर अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, रायगड, रत्नागिरी इत्यादी लहान – मोठी बंदरे यावर आहेत.

बेटे :-

कोकण किनारपट्टीवर नैसर्गिकरित्या असंख्य बेटांची निर्मिती झाली असून, मुंबई हे कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे सात बेटांचा समूह मिळून तयार झालेले एक बेट आहे. इतर लहान – मोठी बेटे कोकण किनारपट्टीवर सांगता येतील. कासा, जंजिरा कुलाबा, खांदेरी, उंदेरी (रायगड), साष्टी, मढ, कुलाबा, छोटा कुलाबा, माजगाव, परळ, माहिम (मुंबई शहर व मुंबई उपनगर), कुरटे (सिंधुदुर्ग), अंजदीव, घारापुरी (एलिफंटा केव्हज) त्यादी बेटे पश्चिम किनार्‍यावर आहेत.

चौपाटी (पुळणी) :-

समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संशयित केलेला वाळूचा भूभाग पुळण म्हणून ओळखला जातो. त्यालाच चौपाटी असे म्हणतात. किनारपट्टीच्या जमिनीकडील बाजूस विस्तीर्ण पुळणी व मऊ मातीचे पट्टे म्हणजेच कोकणातील चौकटीचा प्रदेश होय.

उदा:-  जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी

2) पश्चिम घाट ( सह्याद्री) :-

भारतात अस्तित्वात असणाऱ्या सात पर्वत प्रणाली पैकी एक असणारी पश्चिम घाटाची पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण विस्तारलेली उंच-सखल ‘डोंगर रांग’ होय. सह्याद्री पर्वत हा ठोकळा/गट पर्वत प्रकारच्या पर्वत आहे. पृथ्वीची उत्पत्ती नंतर भूपृष्ठावर निर्माण झालेल्या उंचवट्याची पर्वत बनले. यावर झिजेच्या क्रिया झाल्या, त्याचाच एक भाग म्हणून ठोकळा / गट असा सह्याद्री पर्वत ओळखला जातो.

विस्तार :-

श्‍चिम घाटाचा विस्तार उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील तापी नदी खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यँत आहे. महाराष्ट्रात पश्चिम घाटाचा विस्तार हा दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंत आहे. पश्चिम दिशेने किनारपट्टी खचल्याने सह्याद्री पर्वत पश्चिमेस भिंतीसारखा सरळ किंवा अति तीव्र उताराचा दिसतो, तर पूर्वेस सह्याद्रीचा उतार मंद होत जातो.

लांबी आणि रुंदी :-

एकूण लांबी 1600 किमी असून महाराष्ट्रातील लांबी 650 किमी लांब इतकी आहे. समुद्रसपाटीपासून पश्चिम घाटाची  उंची 915 – 1220 मिटर एवढी सांगता येईल. समुद्रकिनार्‍यापासून सह्याद्रीचे अंतर 30 – 60 किमी एवढी आहे. सह्याद्री पर्वतरांगेची रुंदी उत्तरेस जास्त असून, दक्षिणेस कमी दिसून येते.

सह्याद्री पर्वताचे वैशिष्ट्ये :-

सह्याद्री पर्वताची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उंची कमी झालेली आहे. तर काही ठिकाणी बराच भाग उंच दिसून येतो. काही भागात पर्वताच्या उत्तर बऱ्याच ठिकाणी कमी आहे. या पर्वताची पश्चिम बाजू तीव्र उताराची असून पूर्व भागाचा उतार अगदी सौम्य प्रकारचा आहे. तर काही ठिकाणी डोंगर माथ्यावर सपाटीकरणाचा भाग तयार झालेला आहे.

उदा:-  महाबळेश्वर, पाचगणी परिसर सपाट असा टेबल लँड म्हणून ओळखला जातो. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वतावरील कास पठार (जिल्हा सातारा) महत्वपूर्ण आहे.

प्रमुख जलविभाजक:-

महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेत सह्याद्रीचे स्थान खूप महत्वाचे असून, त्यास महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेचा मापदंड म्हटला जातो. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून उत्तर-दक्षिण गेलेल्या या पर्वतरांगेवर महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे. महाराष्ट्रातील या नद्यांची पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्या अशा गटात विभागणी केली जाते. सह्याद्री पर्वतात उगम पावून पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या तर  सह्याद्रीमध्ये उगम पावून कोकण किनारपट्टी तून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या. या अर्थाने त्यास महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हटला जातो.

त्याचबरोबर सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अशा रीतीने उभा आहे, की नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे त्याच्याद्वारे अडविले जाऊन सह्याद्रीचा पश्चिमेकडे अधिक पाऊस देतात, तर पश्‍चिम घाट/ सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर या मौसमी वार्‍यात कमी पाणी शिल्लक राहिल्याने सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचे प्रमाण कमी असते. या अर्थाने देखील त्यास प्रमुख जलविभाजक म्हणतात.

घाटमार्ग :-

सह्याद्री पर्वत कोकण व पठार यांच्यादरम्यान असल्याने कोकणातून पठारावर जाण्याकरिता सह्याद्री पर्वत ओलांडून जावे लागते. याकरिता सह्याद्री पर्वताची उंची जेथे – जेथे कमी झालेली आहे, त्याठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात आले आहेत.

नाशिक – जव्हार शिरघाट 
नाशिक – मुंबई थळ (कसारा घाट )
ठाणे – नगर माळशेज 
कल्याण – जुन्नर नाणेघाट 
पनवेल – नारायणगाव (मंचरमार्गे)भीमाशंकरघाट 
महाड – महाबळेश्वर पारघाट (रणतुंडी)
मुंबई – पुणे बोरघाट 
नाशिक – धुळेलळींगघाट 
महाड – पुणे वरंधा 
कोल्हापूर – कणकवली हनुमंते 
महाड – खेड – दापोली कशेडीघाट 
कोल्हापूर – राजापूर करूळ 
पुणे – सातारा कात्रज व खंबाटकी 
चिपळूण – कराड कुंभार्ली 
पाचगणी – वाई परसनी 
रत्नागिरी – कोल्हापूर आंबाघाट 
सावंतवाडी – कोल्हापूर फोंडाघाट 
राजापूर – कोल्हापूर अणुस्कुराघाट 
नाशिक -पुणे चंदनापरी 
धुळे – औरंगाबाद औट्रम (कन्नड घाट)
सावंतवाडी – बेळगाव आंबोलीघाट 
पुणे – बारामती (सासवडमार्गे )दिवे घाट 
पुणे – माणगाव ताम्हणीघाट 
महाबळेश्वर – पोलादपूर आंबेनळीघाट 

प्रमुख घाटमार्ग व महामार्ग – महाराष्ट्रातील काही प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर हे घाटमार्ग आहेत.

माळशेज – एन. एच. 222
औट्रम (कन्नड ) – एन. एच. 211
कसारा (थळ) – एन. एच. 03
चंदनापरी – एन. एच. 50
बोर – एन. एच. 04
खंबाटकी – एन. एच. 04 (खंडाळा)
आंबा – एन. एच. 204
लळींग घाट – एन. एच. 03
कशेडी घाट – एन. एच. 17

सह्याद्री पर्वत उंची :-

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 मिटर आहे. परंतु सह्याद्री पर्वत सलग एकसारखा उंच नसून उत्तरेकडे सह्याद्री अधिक उंच आहे, तर दक्षिणेकडे सह्याद्रिची उंची कमी होत जाते. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई असून ते अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरीजवळ आहे. परंतु प्रशासकीय दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात असून त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे.

शिखर उंची (मीटरमध्ये)जिल्हा 
कळसुबाई 1646अहमदनगर 
साल्हेर 1567नाशिक 
महाबळेश्वर 1438सातारा 
हरिश्चंद्रगड 1424अहमदनगर 
सप्तशृंगी 1416नाशिक 
तोरणा 1404पुणे 
राजगड 1376पुणे 
त्रंबकेश्वर 1304नाशिक 
सिंगी 1293नाशिक 
नाणेघाट 1264अहमदनगर 
तौला 1231नाशिक 
ताम्हणी 1226पुणे 
गडलगट्टा 967गडचिरोली 

3) महाराष्ट्र पठार :-

आल्फ्रेड वेनगर यांनी मांडलेल्या भूखंड- वहनाच्या सिद्धांतानुसार महाराष्ट्राच्या भूसीमेचा गोंडवानामध्ये समावेश होतो. म्हणजेच ही भूमी अतिप्राचीन समजले जाते. भारतातील प्राकृतिक विभागांपैकी एक असणाऱ्या द्विकल्पीय पठाराचा भाग म्हणजे दखनचे पठार व त्याचाच एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार होय.

या महाराष्ट्र पठाराने  महाराष्ट्राच्या भूमीपैकी 90 टक्के भूभाग व्यापलेला आहे. पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून ते पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल टेकड्यांपर्यंत सुमारे 750 किमी रूंद, तर उत्तरेस सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस तिलादीपर्यंत सुमारे 700 किमी लांब आहे. महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ 276 लाख हेक्टर (2.76 लाख चौरस. किमी) इतके आहे.

सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण – पश्चिम भागात झालेल्या ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा रसाचे थर एकमेकांवर साचून (सुमारे 40 थर) या पठाराची निर्मिती झाली आहे.

थरांच्या या रचनेला ‘डेक्कन ट्रॅप’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थरांची जाडी ही पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतांमध्ये अधिक तर पूर्वेला विदर्भाकडे कमी होत जाते. त्यामुळे पठाराची उंचीही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. म्हणजेच पठाराचा उतार हा पूर्वेकडे (आग्नेयेकडे) आहे. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या खणन कार्यामुळे महाराष्ट्र पठारावर अनेक डोंगररांगा व नद्यांची खोरी निर्माण झाली.

महाराष्ट्र पठाराचे पश्चिम पठार व पूर्व पठार अशी दोन भागांत विभागणी करता येईल. पश्चिम पठार हे सपाट नसून नदी व डोंगररांग यांनी पिंजून काढलेल्या प्रदेश अशा स्वरुपाची रचना आहे तर पूर्व पठार हा मैदानी प्रदेश भासावा असा सपाट भाग असून लांब – लांबपर्यंत कोणताही भू-उठाव या भागात दिसून येत नाही.

महाराष्ट्र पठारावरील डोंगररांगा

सातमाळा अजिंठा डोंगररांग :-

सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी प्रमुख उपरांग आहे. सह्याद्री मधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ जिल्हा पर्यंत विस्तार आहे. नाशिक जिल्ह्यात या रांगेला सातमाळची डोंगररांग म्हणून, तर पुढे औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याची डोंगररांग असे म्हणतात.

या डोंगररांगेची उंची पूर्वेकडे कमी होत जाते. या डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिम वाहिनी व दक्षिणेकडील गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहेत. नाशिक जिल्ह्यात सातमाळ डोंगर रांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेवर जगातील सुप्रसिद्ध अजिंठा लेणी व वेरुळ लेणी आहेत. अजिंठा डोंगररांगेच्या पूर्वेला दोन शाखा होतात. दक्षिणेकडील नांदेड जिल्ह्यातून जाणारी निर्मल डोंगररांग व दुसरी उत्तरेला यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी अजिंठा डोंगररांग.

पठार प्रदेश :- सातमाळ या डोंगररांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे. अजिंठा या डोंगररांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा :-

सह्याद्री पर्वतातील कळसुबाई पासून ही डोंगर रांग सुरु होउन पूर्वेकडे (आग्नेय) उस्मानाबाद, लातूर जिल्हा पर्यंत पसरलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात या डोंगररांगेस हरिश्चंद्रगड असे म्हणतात. तर बीड जिल्ह्यात ही डोंगररांग बालाघाट  या नावाने ओळखली जाते. या डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी व दक्षिणेकडील पूर्व वाहिनी भीमा नदी या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहे. या डोंगररांगांवर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला आहे.

पठारी प्रदेश – हरिश्चंद्रगड या डोंगररांगेच्या दक्षिण दिशेला अहमदनगर पठार आहे. बालाघाट डोंगर रांगेच्या पश्चिमेला बालाघाट पठार आहे. तर  मांजरा नदीच्या खोऱ्यात मांजरा पठार आहे.

 शंभू महादेव डोंगररांग :-

सह्याद्रीमधील महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी शंभू-महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात प्रवेश करते. या डोंगर रांगेवर वसलेल्या शिखरशिंगणापूर (ता. फलटण, जिल्हा – सातारा) येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात.

या डोंगर रांगेने उत्तरेकडे असणारी पूर्व वाहिनी भीमा व दक्षिणेकडे असणारी पूर्व वाहिनी कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहेत. या डोंगर रांगांच्या काही उपरांगा खालील प्रमाणे आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस – सीताबाई डोंगर, तर उत्तर दक्षिण – बामनोली

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस – आगाशिवा  डोंगर व पश्चिमेस यवतेश्वर डोंगर

या डोंगररांगेवर टेबल लैंड करिता प्रसिद्ध असलेले पाचगणी ही थंड हवेचे ठिकाण आहे

पठारी प्रदेश :-

शंभू महादेव डोंगर रांगेच्या पश्चिम दिशेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत.
शंभू महादेवाच्या डोंगर रांगेच्या मध्यभागात औंध चे पठार आहे.
शंभू महादेवाचा डोंगर रांगेच्या दक्षिणेला  खानापूरचे पठार आहे व त्यापुढे सांगली जिल्ह्यात जत चे पठार आहे.
शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे.

सातपुडा पर्वत:-

महाराष्ट्र पठाराच्या उत्तर सीमेवरून पूर्व-पश्चिम समांतर पसरलेली डोंगररांग म्हणजे सातपुडा पर्वत होय. या पर्वतात एकामागे एक अशा सात डोंगररांगा किंवा सात पुडे 7 वळ्या 600 मीटर उंचीपर्यंत चढत जातात व उत्तरेस  नर्मदा नदीकडे एकदम खाली उतरताना दिसतात या रांगा एकमेकांना समांतर दिसतात. त्यावरून त्यास  सातपुडा (सेव्हन फोल्ड्स) असे म्हणतात. भारतातील हिमालया खालोखाल विंध्य सातपुडा हा प्रमुख जलोत्सारक पर्वत आहे.

विस्तार:

गुजरातमधील रतनपुर पासून पूर्वेस मध्यप्रदेशातील अमरकंटक पर्यंत पसरलेल्या या पर्वत – श्रेणीची लांबी सुमारे 900 किमी आहे. रुंदी कमाल 160 किमी इतका आहे. या पर्वत श्रेणीचा आकार सर्वसाधारण त्रिकोणाकृती असून पाया पूर्वेस उत्तर-दक्षिण पसरलेल्या मैकल डोंगररांगेचा आहे. तर शिरोभाग पश्चिमेस राजपिपला डोंगररांग आहे. महाराष्ट्राचा विचार करता या पर्वतश्रेणीतील तोरणमाळची डोंगररांग नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यांतून पश्चिम-पूर्व जाते तर गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यातून जातात.

या पर्वताची सरासरी उंची 1000 मीटर आहे. सातपुडा हा चंद्रकोरीचा आकार आकाराचा असून त्याच्या दक्षिण उतार तीव्र आहे, तर उत्तरेकडील उतारा लहान-मोठ्या टेकड्यांच्या स्वरूपात मंद होत गेला आहे.

सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा

तोरणमाळ डोंगररांग :-

ही रांग नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागापासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून पश्चिम-पूर्व 100 किमी लांब पसरलेली आहे. या डोंगररांगेने उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नदी नर्मदा व दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी तापी नदी  या दोन नद्यांची खोरी  वेगवेगळी केलेली आहेत. या डोंगररांगेवरील अस्तंभा डोंगर हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची 1325 मी इतकी आहे. या डोंगररांगेवर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ तोरणाच्या फुलांवरून आलेले नाव हे थंड हवेचे ठिकाण आहे व जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे.

गाविलगड डोंगर

अमरावती जिल्ह्यातील वायव्य भागातील धारणी, चिखलदरा या तालुक्यांतून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगा गाविलगडच्या टेकड्या या नावाने ओळखतात. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतांची पूर्व-पश्चिम लांबी 100 किमी आहे.  गाविलगड डोंगर रांग ही तापी नदी व पूर्णा नदी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे. गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर हे वैराट डोंगर असून त्याची उंची 1177 मीटर इतकी आहे. या डोंगररांगेवर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

1)अस्तंभा डोंगर (तोरणमाळची डोंगररांग) – 1325 मीटर, जिल्हा नंदुरबार
2)वैराट डोंगर (गाविलगडचा डोंगर) – 1177 मीटर जिल्हा, जिल्हा.:- अमरावती
3)चिखलदरा (गाविलगडचा डोंगर) – 1118 मी. जिल्हा:- अमरावती

महाराष्ट्र पठारावरील नद्यांची खोरी

तापी-पूर्णा खोरे:-  

तापी नदी खोरे प्रकल्प
तापी नदी खोरे प्रकल्प

सातपुडा पर्वत व सातमाळ अजिंठा डोंगररांगा दरम्यान तापी-पूर्णा खोरे पसरलेले आहे. या खोऱ्यातून तापी व पूर्ण या नद्या पूर्वेकडून – पश्चिमेकडे वाहतात. प्रस्तर भंगामुळे हे खोरे खचदरी स्वरूपाचे आहे. या नदीखोऱ्यात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक व विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतो. या नदीखोऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ ५१,५०४ चौ. कि. मी. इतके आहे.

गोदावरी खोरे :-

गोदावरी नदी खोरे प्रकल्प
गोदावरी नदी खोरे प्रकल्प

सातमाळ अजिंठा डोंगररांग व हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेदरम्यान गोदावरी नदीचे मुख्य खोरे विस्तारलेले आहे. या नदीखोऱ्यांचे स्वरूप पश्चिमेकडे अरुंद तर पूर्वेकडे रुंद आहे. या नदीखोऱ्यात नाशिक, अहमदनगर व संपूर्ण मराठवाडयातील जिल्ह्यांचा समावेश होतो. या नदीखोऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ विदर्भातील प्राणहिता नद्यांच्या खोऱ्यासह १,५२,५८८ असून महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४९ टक्के भाग हा या खोऱ्याने व्यापलेला आहे.

भीमा खोरे :-

भीमा नदी खोरे प्रकल्प
भीमा नदी खोरे प्रकल्प

भीमा नदी कृष्णेची उपनदी जरी असली, तरी कृष्णेला ती कर्नाटकात जाऊन मिळते. तसेच महाराष्ट्रात भीमेचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने भीमेचे खोरे स्वतंत्र अभ्यासावे लागते.  हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व शंभू महादेवाच्या डोंगररांगेदरम्यान भीमा नदीचे खोरे पसरलेले आहे. या खोऱ्याचा आकार आयताकृती असून उतार आग्नेयेकडे आहे.

या खोऱ्यात पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग, नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग त्याचबरोबर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही भागाचा समावेश होतो. या नदीखोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ४६,१८४ चौ. कि. मी. आहे.

कृष्णा नदीखोरे :-

कृष्णा नदी खोरे प्रकल्प खोरे
कृष्णा नदी खोरे प्रकल्प खोरे

पश्चिमेला सह्याद्री पर्वत व उत्तर- पूर्वेला शंभू महादेवाची डोंगररांग या दरम्यान त्रिकोणी आकारात या नदीखोऱ्याचा विस्तार आहे. या नदीखोऱ्यात सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग येतो. या नदीखोऱ्याने महाराष्ट्रातील एकूण २८,७०० चौ. कि. मी. इतके क्षेत्रफळ व्यापले आहे. कृष्णा नदीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

वर्धा वैनगंगा खोरे:-

वर्धा वैनगंगा खोरे प्रकल्प
वर्धा वैनगंगा खोरे प्रकल्प

पूर्व पठार रचना

पेनगंगा ते इंद्रावती नदी दरम्यान चा भाग पूर्व पठाराचा म्हणून उल्लेख होतो. पूर्व पठाराची रचना पुढीलप्रमाणे दिसून येते.

आर्वी पठार:-

वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेला आहे.

रामटेक टेकड्या:-

कन्हान नदीच्या पूर्वेस असणाऱ्या या टेकड्यांत पेंच व बावनथडी सारख्या अनेक नद्यांचे उगम आहेत.

नागपूर मैदान :-

नागपूरच्या सभोवताली कन्हान व तिच्या उपनद्यांनी तयार केलेली मैदाने

वर्धा मैदान:-

वर्धा नदीच्या खोऱ्यातील उत्तरेकडील वर्धा यवतमाळ व उत्तर चंद्रपूर या जिल्ह्यांत उर्ध्व वर्धा मैदान तर दक्षिण चंद्रपूर जिल्ह्यात निम्न वर्धा मैदान आहे.

वैनगंगा मैदान:-

चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेरेषेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पूर्वेस व पश्चिमेस भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत उर्ध्व वैनगंगा मैदान, तर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत निम्न वैनगंगा मैदान पसरलेले आह.

पूर्वेकडील टेकड्या :-

महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडे पूर्व सीमेलगत गोदावरी व महानदी या नद्यांचा जलविभाजक म्हणून अनेक टेकड्या आहेत. त्यात प्रामुख्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे गोंदिया जिल्ह्यात दरकेसा टेकड्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड भामरागड अहिरी टेकड्यांचा समावेश होतो.

प्राणहिता खोरे :-

पैनगंगा, वर्धा व वैनगंगा या नद्या मिळून तयार होणारी प्राणहिता नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. त्यामुळे प्राणहिता खोरे हा गोदावरी खोऱ्याच्या उपविभाग आहे. प्राणहिता नदी खोऱ्याचे संपूर्ण पूर्व पठार व्यापलेला असून विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश होतो. या नदीखोऱ्याचा उतार दक्षिणेकडे आहे.

जिल्हा डोंगर 
जळगाव घोडसगाव, हस्ती, शिरसोली, चांदोर 
धुळे धानोरा, गाळणा 
नंदुरबार अस्तंभा 
नाशिक साल्हेर – मुल्हेर, सातमाळ, वणी, मांगी – तुंगी, चांदवड 
अहमदनगर कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्रगड, अदुला 
मुंबई उपनगर व जिल्हा कोन्हेरी, खंबाला, शिवडी, अँटॉप हिल, पाली, मलबार हिल 
ठाणे तुंगार 
पुणे तसूबाई, अंबाला, ताम्हाणी, शिंगी , पुरंदर 
सातारा सीताबाई, बामणोली, परळी, आगाशिव, म्हस्कोबा, मढोशी, मांढरदेव, यवतेश्वर, शंभू महादेव 
सांगली कमळभैरव, होनाई, मल्लिकार्जुन, दंडोबा, बेलगवाड, आष्टा, आडवा, मुंचुंदी, शुक्राचार्य 
सोलापूर रामलिंग, महादेव, बालाघाट, शुक्राचार्य 
कोल्हापूर उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, पन्हाळा, चिकोडी, दक्षिण सह्याद्री 
औरंगाबाद अजिंठा, चौक्या, सुरपालनाथ 
उस्मानाबाद बालाघाट, नळदुर्ग, तुळजापूर 
नांदेड मुदखेड, निर्मळ, सातमाळा, बालाघाट 
परभणी अजिंठा व बालाघाट 
हिंगोली हिंगोली डोंगर 
लातूर बालाघाट डोंगर 
नागपूर गरमसूर, हादागड, सातपुडा डोंगर 
भंडारा अंबागड 
गोंदिया नवेगाव, प्रतापगड, गायखुरी 
चंद्रपूर चांदूरगड, पेरजागड 
गडचिरोली चिकियाला, सिरकोंडा, रियागड, सुरजगड, भामरागड 
वर्धा रावणदेव, गरमसूर, नांदगाव, मालेगाव 
अमरावती धारणी, गाविलगड, चिखलदरा 
वाशीम अजिंठा डोंगर 
यवतमाळ अजिंठा डोंगर 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

10 Comments

  1. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर
    अस्तंभा
    की
    धुपगड

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *