पोलिस कारवाई संदर्भात वेगवेगळे शब्द किंवा संकल्पना वापरल्या जातात. उदा. घराची झडती घेण्यात आली किंवा चौकशीसाठी चौकीत बोलावले जाते इ. अशा वेळेस पोलिस नक्की काय करतात आणि नागरिक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी. यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण पोलिस कारवाई संदर्भातील आपले अधिकार वापरु शकू.

गुन्हयाचे दोन प्रकार आहेत. दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा.या दोन्हीत फरक आहे.

*गुन्ह्याचे प्रकार*
*०१) दखलपात्र गुन्हा* – या गुन्हयाची दखल पोलिसांना घ्यावीच लागते. याबाबत ताबडतोब तपास सुरु करावा लागतो. या गुन्हयात वॉरंट शिवाय पोलिस आरोपीला अटक करु शकतात. गुन्हयाची नोंद एफ.आय.आर. रजिस्टर मध्ये लिहिली जाते. उदा. चोरी, खून, बलात्कार इ.

*०२) अदखलपात्र गुन्हा* – एन.सी. हा शब्द अदखलपात्र गुन्हयासाठी वापरला जातो. या गुन्हयात पोलिसांना न्यायाधिशाच्या हुकुमाशिवाय अटक करण्याची परवानगी नसते. या गुन्हयासाठी वेगळे रजिस्टर ठेवले जाते. उदा. शिवीगाळ करणे, क्षुल्लक कारणावरुन भांडणे, मारहाण इ.

*गुन्हयाची नोंद किंवा तक्रार पोलिसांकडे दिली जाते. तक्रार खालील स्वरुपात होते.*
• एफ.आय.आर. (प्रथम दर्शनी माहिती अहवाल )
• एन.सी. (अदखलपात्र गुन्हा)
• कोर्टामध्ये खाजगी तक्रार

*एफ.आय.आर. दाखल करतांना खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.*
• गुन्हा जिथे घडला असेल त्याच हद्दीतील पोलिस चौकीत नोंदवावा.
• तक्रार नेहमी लेखी स्वरुपात द्यावी. त्यामध्ये गुन्हा कुठे, केव्हा आणि कसा घडला व कुणी केला (माहित असल्यास) याविषयी सविस्तरपणे लिहिणे गरजेचे आहे.
• तक्रारीची एक प्रत स्वत:कडे ठेवावी. त्यावर संबंधित अधिकाऱ्याची सही घ्यावी.
• मारहाण झाली असेल तर पोलिस चौकीतून पत्र घेवून तात्काळ सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. सरकारी दवाखान्यातील प्रमाणपत्र (जे मोफत मिळते) पोलिस चौकीत द्यावे. त्याची एक प्रत स्वत:कडे ठेवावी.
• एफ.आय.आर. स्वत: वाचल्यावर किंवा इतरांकडून वाचून घेतल्यावरच त्यावर सही करावी.
• तक्रारीत स्वत:च्या सांगण्यानुसार नोंदी झाल्या नसतील तर सही करु नये. अन्यथा त्यात दुरुस्ती करुन त्या प्रत्येक दुरुस्तीवर सही करावी.
• तक्रार करताना हजर असलेल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचं नाव व बिल्ला क्रमांक यांची नोंद आपल्याकडे ठेवावी.
• स्त्रियांना किंवा १५ वर्षाखालील मुलाला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवता येत नाही.
• पोलिस किंवा संबंधित अधिकारी तुमचे म्हणणे ऐकून घेत नसतील तर मॅजिस्ट्रेटला सर्व घटनेची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात द्यावी.
• पोलिसांकडून मारहाण किंवा छळवणूक झाल्यावर न्यायाधिशांकडे तक्रार करून डॉक्टरी तपासणीची मागणी करता येते.

*चौकशी*
• कोणत्याही कागदावर न वाचता, न समजून घेता सही, अंगठा करु नका.
• कोणाही व्यक्तीला चौकशीसाठी किंवा तपास करण्यासाठी पोलिस चौकीत बोलवायचे असल्यास तसा हुकूम पोलिस अधिकाऱ्याने लेखी दिला पाहिजे.
• १५ वर्षाखालील कोणासही चौकशीसाठी पोलिस चौकीत बोलाविता येत नाही. तसेच कोणत्याही स्त्रीला प्रश्न विचारायचे असतील तर ते तिला तिच्या घरीच जाऊन विचारले पाहिजेत.
• चौकशीच्या वेळी तुम्ही मित्र-मैत्रीण, वकील किंवा नातेवाईकांची मदत घेऊ शकता.
• तुम्हाला खोट्या आरोपात अडकवले जात आहे असे वाटले तर तुम्ही उत्तरे देण्याचे नाकारु शकता. मात्र उत्तरे देणार असाल तर खरी माहिती द्या.
• विचारपूस करण्यासाठी पोलिस तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवू शकत नाहीत, धमकावू शकत नाहीत किंवा लालूचही दाखवू शकत नाहीत.
• पोलिसांना कोणत्याही कागदावर जबरदस्तीने तुमच्याकडून सही किंवा अंगठा घेता येणार नाही.

*तपास*
• महिला पोलिसच महिलेची अंगझडती घेऊ शकते.
• झडती किंवा जप्तीच्या वेळी कोणीही दोन तटस्थ किंवा प्रतिष्ठित व्यक्ती हजर असणे गरजेचे आहे.
• झडती/तपासणीचा पंचनामा केला पाहिजे. जप्त वस्तू पंचनाम्यात लिहणे गरजेचे आहे.
• पंचनाम्याची प्रत तुम्हाला देणे पोलिसांवर बंधनकारक आहे.
• जामीन म्हणजे खटल्याच्या सुनावणीच्या काळात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला काही अटी घालून सोडतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *