जन्म:२८ मे १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू:२६ फेब्रुवारी १९६६
दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके:मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म:हिंदू
प्रभाव:शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी
प्रभावित:अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शेषराव मोरे
वडील:दामोदर विनायक सावरकर
आई:राधाबाई दामोदर सावरकर
पत्नी:यमुनाबाई विनायक सावरकर [ माई ]
अपत्ये:प्रभाकर, प्रभा, शालिनी , विश्वास
तळटिपा:स्वतंत्र भारत सृजनशील भारत

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी तसेच हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

सावरकरांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्र्यसंग्राम होता.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते.

वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते.

सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली.

थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला.

सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.

जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत.

त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.

चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.

लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली.

मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली .

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती.

लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले.

ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले.

मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य!

मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले.

ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.

त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला.

या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली.

कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.

अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर‘ हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला.

ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती.

मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले.

ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.

नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली.

समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०).

ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले.

त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).

मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले.

हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले.

विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात.

पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर – असे त्यांचे रूप दिसते.

तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर – अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

विनायक दामोदर सावरकरांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाचे मुद्दे (सन १८८३ ते १९६६)

१९०० – पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

१९०४ – मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

१९०६ – ‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापट यांना (सेनापती बापट यांना) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

१९०८ – सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

अनंत कान्हेरेने १९०९मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

न्यायाधीश जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना १९११मध्ये पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.

१९२४मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकारणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदुपदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ इत्यादींचे लिखाण केले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.