Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 January 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ जानेवारी चालू घडामोडी
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: गिलचे धडाकेबाज द्विशतक
- सलामीवीर शुभमन गिलने (१४९ चेंडूंत २०८ धावा) आपली गुणवत्ता व प्रतिभा सिद्ध करताना केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी सरशी साधली. मायकल ब्रेसवेलच्या (७८ चेंडूंत १४०) झंझावाती खेळीमुळे न्यूझीलंडला विजयाची संधी निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस मुंबईकर शार्दूल ठाकूरने ब्रेसवेलला पायचीत पकडत भारताला निसटता विजय मिळवून दिला.
- हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर अडखळत्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडने विजयासाठी झुंज दिली. मात्र, अखेरीस न्यूझीलंडचा डाव ४९.२ षटकांत ३३७ धावांत संपुष्टात आल्याने भारताने सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
- गेल्या काही काळापासून गिलबाबत बरीच चर्चा केली जात आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागत होते. त्यामुळे त्याने एकदिवसीय संघातील स्थान गमावले आणि त्याच्या जागी गिलला सलामीला संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला. गिलने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा विश्वास सार्थ ठरवला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्याने द्विशतकी खेळी साकारत आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थानाकरिता आपली दावेदारी अधिकच भक्कम केली आहे.
- या सामन्यात गिल आणि कर्णधार रोहित शर्मा (३८ चेंडूंत ३४) यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. रोहित लयीत दिसत होता. मात्र, वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. तसेच गेल्या चारपैकी तीन सामन्यांत शतक करणारा विराट कोहली (८) आणि इशान किशन (५) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर गिलने सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत ३१) आणि हार्दिक पंडय़ा (३८ चेंडूंत २८) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदाऱ्या रचत भारताचा डावाला आकार दिला. तसेच अखेरच्या षटकांत गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरे शतक ८७ चेंडूंत, तर पहिले द्विशतक १४५ चेंडूंत पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत १९ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली.
तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ;त्रिपुरा, मेघालय, नागालँडचा समावेश; २ मार्च रोजी मतमोजणी
- ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर, मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होईल.तीनही विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये वेगवेगळय़ा तारखांना संपणार आहे.
- त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आहे. ईशान्येकडील एकमेव पक्ष ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीची मेघालयमध्ये सत्ता आहे.
- याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महम्मद फैजल यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवल्याने या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून सर्व मतदारसंघात २७ फेब्रुवारीला मतदान होईल. इतर निकालासह २ मार्च रोजी मतमोजणी होईल.
कंगाल पाकिस्तानला बसणार मोठा झटका? अमेरिकेतील बायडेन सरकार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
- अफगाणिस्तानंतर पाकिस्तानाचीही गैर-नाटो सदस्यता रद्द करण्यासंदर्भात अमेरिकेकडून विचार सुरू आहे. यासंदर्भात खासदार एंडी बिग्स यांनी अमेरिकी संसदेत विधेयक (HR 80 ) मांडले आहे. या विधेयकावर जो बायडेन यांनी स्वाक्षरी केल्यास पाकिस्तानची गैर-नाटो सदस्यता रद्द होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी हे विधेयक प्रतिनिधी सभा आणि सीनेटमध्ये पारीत होणे आवश्यक असून त्यासाठी हे विधेयक परराष्ट्र व्यवहार समितीकडे पाठवण्यात आले आहे.
- गैर-नाटो सदस्यतेचे फायदे काय – गैर-नाटो सदस्य म्हणून अमेरिकेकडून पाकिस्तानला संरक्षण आणि संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. तसेच पाकिस्तानला कर्ज पुरवठादेखील केला जातो. ही सदस्यता जर अमेरिकेकडून रद्द करण्यात आली तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आणखी एका नव्या संकटाचा सामना करावा लागेल.
- यापूर्वी अफगाणिस्तानची नाटो सदस्यता रद्द – गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानची गैर-नाटो सदस्यता रद्द केली होती. अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला होता. गेली अनेक वर्ष गैर नाटो सदस्य म्हणून अमेरिकेकडून अफगाणिस्तानला संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत केली जात होती.
- सध्या १८ गैर-नाटो सदस्य देश – अमेरिकेने १९८७ मध्ये मित्र राष्ट्रांना गैर-नाटो सदस्यता देण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बहरीन, ब्राझील, कोलंबिया, इजिप्त, इस्रायल, जपान, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, न्यूझीलंड, पाकिस्तान, फिलीपिन्स, कतार, दक्षिण कोरिया, थायलंड, ट्युनिशिया आणि अफगाणिस्तान अशा १९ देशांना गैर-नाटोची सदस्यता देण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षी अफगाणिस्तानची सदस्यता रद्द केल्यानंतर आता केवळ १८ देश सदस्य आहेत.
विराट कोहली बनणार ‘वन डे’तील नंबर १ फलंदाज, बाबर आझमची खुर्ची धोक्यात
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. आज पहिला सामना हैदराबादमध्ये आहे. याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहलीने अप्रतिम कामगिरी केली आहे.
- विराट कोहलीही मधल्या काळात टॉप १०च्या यादीतून बाहेर होता, पण यादरम्यान त्याने चार सामन्यात तीन शतके झळकावून फॉर्ममध्ये परतल्याबद्दल जगाला सांगितले आहे. विराट कोहली आता तीन-चार वर्षांपूर्वी जशी फलंदाजी करत होता, तशीच फलंदाजी करत आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये एंट्री केली असून कोहलीने भविष्यातही असाच फॉर्म कायम ठेवला तर पहिल्या क्रमांकाचे स्थान त्याच्यापासून फार दूर नाही, असे मानले जात आहे.
- आयसीसीच्या ताज्या वन डे क्रमवारीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आयसीसीच्या नव्या क्रमवारीत विराट कोहली ७५०च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर आझमच्या रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर ते ८८७ आहे. रासी व्हॅन डर डुसेन ७६६ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर क्विंटन डिकॉक आता तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ७५९ आहे. विराट कोहली ७५० रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे.
- ताज्या क्रमवारीत विराट कोहलीला चार स्थानांचा फायदा झाला आहे. डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ७४७ वर पोहोचले आहे. त्यांनी एक पद गमावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा इमाम-उल-हक सहाव्या स्थानावर असून त्याचे रेटिंग ७४० आहे. त्याला एक जागाही गमवावी लागली आहे. टॉप १० नंतर चार फलंदाजांबद्दल बोलायचे तर, केन विलियम्सन सातव्या क्रमांकावर आणि स्टीव्ह स्मिथ आठव्या क्रमांकावर आहे, ज्यांनी या क्रमवारीत एक स्थान गमावले आहे. यानंतर जॉनी बेअरस्टो नवव्या तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, मेट्रो २ सह विविध प्रकल्पाचं करणार लोकार्पण; जाणून घ्या प्रत्येक अपडेट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
- वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण पार पडेल. त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे. यावेळी पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
- दरम्यान, या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारी बरीचशी कामं ही महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १७ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १६ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १५ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
- १४ जानेवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |