Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |22 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२२ जुलै चालू घडामोडी
रोहित शर्माने धोनी-सेहवागला मागे टाकत ‘या’ विक्रमाची केली नोंद
- गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आपापले अर्धशतक पूर्ण करून परतले. त्याचवेळी जेव्हा टीम इंडियाने लंचनंतर बॅटिंगला सुरुवात केली, तेव्हा टीमचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका मोठ्या विक्रमासह मागे टाकले आहे.
रोहितने धोनी-सेहवागला मागे टाकले –
- भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. यासह रोहितच्या नावावर आता १७२९८ धावा झाल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १७२६६ धावांसह महेंद्रसिंग धोनी आणि १७२५३ धावांसह वीरेंद्र सेहवागला मागे टाकले.
सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन-विराट आघाडीवर –
- भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिनच्या नावावर ३४३५७ धावा आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाने सचिनपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या नाहीत. विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने भारतासाठी २५४०० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तिसरे नाव राहुल द्रविडचे (२४०६४ धावा) आहे. याशिवाय सौरव गांगुली १८४३३ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने डब्ल्यूटीसी दोन हजार धावांचा टप्पा पार केला –
- रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात २००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितपूर्वी इतर कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम केला नाही. या सामन्यापूर्वी रोहितने २४ कसोटीत ५२.८३ च्या सरासरीने १९५५ धावा केल्या होत्या. पण उपाहारापूर्वी रोहित ६३ धावांवर नाबाद माघारी परतला होता, यासह त्याने २००० धावांचा टप्पा ओलांडला.
‘रिलायन्स’कडील पाचही विमानतळे सरकार ताब्यात घेणार
- राज्यातील बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ, धाराशिव ही पाचही विमानतळे ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लि’. कंपनीच्या ताब्यात असून ही कंपनी व्यवस्थित काम करीत नसल्याने महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन हे सर्व विमानतळ सरकार ताब्यात घेईल.
- तसेच राज्यांतर्गत विमानसेवा अधिक वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- राज्यातील १८ पैकी केवळ सातच विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याबद्दल अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, रोहित पवार, सुनील प्रभू, प्रणिती शिंदे,आदित्य ठाकरे आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. हे पाच विमानतळ रिलायन्स कंपनीस ३० वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र आता सरकार ते ताब्यात घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
यंदा मराठीमधून वैद्यकीय शिक्षण दूरच, अभ्यासक्रम भाषांतराचे काम संथ गतीने
- शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याची घोषणा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्यच तयार नसल्याचे उघडकीस आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणाची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचा मराठीमधून अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अन्य राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण त्यांच्या भाषेतून मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही मराठीतून वैद्यकीय शिक्षण मिळायला हवे, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठीमधून वैद्यकीय शिक्षण शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने समितीही स्थापन केली. त्यानुसार मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपविण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचे इंग्रजी भाषेतील शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये भाषांतरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपवण्यात आली. विद्यापीठाने ही जबाबदारी स्वीकारून भाषांतर करण्यासाठी नियुक्त करण्यात येणारे प्राध्यापक, मुद्रित शोधक आदींच्या मानधनासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. संचालनालयाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र सरकारने या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे मराठी भाषांतर करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
- नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यनंतर राज्यामध्ये २० जुलैपासून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मराठीमधून वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साहित्यच उपलब्ध नाही.
- वैद्यकीय शिक्षणासाठी मराठीमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. – डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय.
देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे १,४१३ कोटींची संपत्ती, तर सर्वात गरीब आमदाराकडे फक्त १,७०० रुपये
- देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे तब्बल १,४०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालमधील एका आमदाराच्या नावावर २,००० रुपयेसुद्धा नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत आमदारांची यादी पाहिली तर लक्षात येईल की, या यादीतले पहिले तिन्ही आमदार कर्नाटकमधील आहेत.
- एडीआरच्या अहवालानुसार के. एच पुट्टास्वामी गौडा हे देशातले दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गौडा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्याकडे १,२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रिया कृष्णा यांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे १,१५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सपंत्तीबद्दल प्रश्न विचारल्यावर डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सर्वात श्रीमंत नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्वात श्रीमंत नसलो तरी गरीबही नाही. मी स्वतःला श्रीमंत मानत नाही, कारण माझ्याकडे जी संपत्ती आहे, ती कमवायला मला खूप वेळ लागला आहे.
- देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिल्या १० पैकी चार आमदार काँग्रेसचे आणि तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत. या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद म्हणाले, शिवकुमार यांच्यासारखे लोक व्यावसायिक आहेत आणि त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही भाजपा आमदारांकडे जरा पाहा. प्रामुख्याने खाण घोटाळ्यातील आरोपींकडे पाहा. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद यांच्या वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला आहे. कर्नाटक भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश कुमार म्हणाले, काँग्रेसला श्रीमंत लोक आवडतात.
सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार
- देशातील आमदारांच्या संपत्तीवरून बनवलेल्या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक (सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार) पश्चिम बंगालमधील भाजपा आमदार निर्मल कुमार धारा यांचा आहे. त्यांची एकूण संपत्ती केवळ १,७०० रुपये इतकी आहे. तसेच ओडिशातील अपक्ष आमदार मकरंदा मुदुली यांच्याकडे केवळ १५,००० रुपये इतकीच संपत्ती आहे. पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार नरिंदर पाल सिंह यांच्याकडे केवळ १८,३७० रुपयांची संपती आहे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र; ‘डब्लूएफआय’ची निवडणूक १२ ऑगस्टला
- विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी एम. एम. कुमार यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याला या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
- भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. महासंघाच्या वतीने हंगामी समितीचीही स्थापना करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निर्णय लागला. मात्र, त्यानंतर मुदत संपलेल्या कार्यकारिणीने विशेष अधिकार वापरून राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता काढून घेत हंगामी समिती कायम ठेवली होती.
- ‘डब्लूएफआय’ची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांच्याही वतीने मतदानासाठी हक्क सांगण्यात आला होता. असाच प्रश्न हरियाणा, तेलंगण, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्यांबाबतही होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्वाचे म्हणणेही ऐकून घेतले होते. परंतु आसाम कुस्ती संघटनेने गुवाहाटी न्यायालयात धाव घेतल्याने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. निवडणूक प्रक्रियेला नव्याने सुरुवात केल्यावर कुमार यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांनाही निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.
- निवडणुकीत सर्व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमानुसार माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, ते निवडणुकीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. अशा वेळी त्यांचा मुलगा करण निवडणूक लढवणार का, याकडे आता नजरा असतील. त्याचबरोबर मध्यंतरी क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांपैकी कुणालाच निवडणूक लढवता येणार नाही असे म्हटले होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २१ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २० जुलै २०२३ चालू घडामोडी
- १९ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १८ जुलै २०२३ चालू घडामोडी
- १७ जुलै २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |