Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |26 April 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२६ एप्रिल चालू घडामोडी
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – जयभारत क्रीडा मंडळाला विजेतेपद:
- नवोदित क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात जयभारत क्रीडा मंडळ संघाने विजय क्लब संघाचे कडवे आव्हान 38-32 असे संपुष्टात आणत जेतेपद पटकावले. जय भारतचा अनिकेत मिटके या गटातील सर्वोत्तम अष्टपैलू कबड्डीपटू ठरला.
- श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत जयभारत संघाने लढतीत आधीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले होते. अनिकेत मिटके आणि सिद्धेश सावंतच्या चढायांनी विजय क्लबचा बचाव भेदण्यात यश मिळवले .
- त्यामुळेच विजयी जय भारत संघाला मध्यंतरालाच २१-१९ अशी दोन गुणांची आघाडी मिळाली होती. पण, विजय क्लबचे चढाईपटू कार्तिक मिश्रा आणि राज नाटेकर यांनी जय भारत संघाला एकेक गुणांसाठी संघर्ष करायला लावला.
- जयभारत संघाच्या ओमकार मोरेच्या ताकदीचा खेळही अतिशय बहारदार झाला. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.त्यापूर्वी, या गटातील उपांत्य लढतीत विजय क्लबने अमर क्रीडा मंडळाचे आव्हान 30-26 असे संपुष्टात आणले. तर, जय भारतने बंडय़ा मारुती संघाला 30-13 असे नमवले.
देशभरातील 51 व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबा 14 व्या क्रमांकावर
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी अलीकडील व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला आहे. असे असताना हे राष्ट्रीय उद्यान सध्या व्हेरी गुड कॅटेगरीत आले आहे, तर या अभयारण्याला उत्कृष्ट श्रेणी मिळण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्रातील पेंच वन्यजीव प्रकल्प ८ व्या क्रमांकावर आहे.
- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी २०२२ च्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन (MEE) प्रक्रियेच्या ५ व्या टप्प्याचे निकाल जाहीर केले आहेत. ज्या अंतर्गत पेरियार व्याघ्र प्रकल्पाला प्रथम स्थान घोषित करण्यात आले. दुसरे स्थान अनुक्रमे सातपुडा आणि बांदीपूर आणि तिसरे स्थान नागरहोल यांना देण्यात आले आहे. ही रँकिंग ४ श्रेणींमध्ये विभागली आहे.
- केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या मदतीने मूल्यांकन केले जाते. हे रँकिंग राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्य कसे व्यवस्थापित केले जात आहे, ते त्यांच्या मूल्यांचे संरक्षण करत आहेत का, त्यांनी मान्य केलेली उद्दिष्टे आणि उद्दिष्टे ते साध्य करत आहेत का, इत्यादी परिभाषित करते. ही क्रमवारी ४ श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. ४० टक्क्यांपर्यंत गुण असलेला वन्य जीव प्रकल्प तथा राष्ट्रीय उद्यान निकृष्ट दर्जा देण्यात आला आहे. ४१ ते ५९ टक्के गुण असलेला प्रकल्प स्वच्छ, ६० ते ७४ टक्क्यांपर्यंत गुण असलेला प्रकल्प उत्कृष्ठ आणि ७५ वरील रँकिंग सर्वोत्तम मानली जाते.
- पेरियार व्याघ्र प्रकल्पाला ९४.३८ टक्के गुण मिळाले आहेत. हा वन्य जीव प्रकल्प सर्वोत्तम गणला गेला आहे. त्या पाठोपाठ सातपुडा आणि बांदीपूरला ९३.१८ टक्के आणि नागरहोल प्रकल्पाला ९२.४२ टक्के गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पेंच वन्य जीव प्रकल्पाला देशात उत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे.
सुदानमधील भारतीयांचा पहिला गट मायदेशाकडे
- सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचा पहिला गट मायदेशी निघाला आहे. ऑपरेशन ‘कावेरी’अंतर्गत मंगळवारी आयएनएस सुमेधा हे जहाज २७८ जणांना घेऊन पोर्ट सुदानहून सौदी अरेबियामधील जेद्दाह बंदराकडे निघाले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी याबद्दल माहिती देणारे ट्वीट केले. दरम्यान, सुदानचे सैन्य आणि निमलष्करी दल (आरएसएफ) यांच्यातील प्रस्तावित ७२ तासांच्या शस्त्रविरामाचे पूर्णत: पालन न झाल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. सुदानमधील हिंसेमध्ये आतापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
- सुदानमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त भारतीय अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन ‘कावेरी’ आखण्यात आले आहे. त्यासाठी जेद्दाह येथे हवाई दलाची दोन लढाऊ विमाने तैनात ठेवण्यात आली असून आयएनएस सुमेधा ही नौका तैनात करण्यात आली आहे. जेद्दाहमध्ये उतरलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ही लढाऊ विमाने फेऱ्या मारणार आहेत. श्रीलंकेच्या नागरिकांची सुटका करण्यासाठीही भारत मदत करत असून त्यामुळे श्रीलंकेने भारताचे आभार मानले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांच्यासह इतर देशांचेही बचावकार्य सुरू आहे.
- विविध देशांनी सुदानमध्ये अडकलेल्या आपापल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आघाडी घेतली असताना, सुदानी नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. संघर्षांमुळे अन्नधान्य आणि इंधनाची चणचण जाणवत आहे. तसेच वीज आणि पाणीपुरवठाही बंद आहे. तसेच आरोग्यसेवाही कोसळली आहे. हिंसेमुळे मदतकार्यात अडथळे येत असून संयुक्त राष्ट्रांनी त्यामध्ये कपात केली आहे. परदेशी नागरिक मोठय़ा प्रमाणात देश सोडून जाणे हे सुदानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याची इतर देशांना खात्री पटल्याचे चिन्ह मानले जात आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यावर संघर्ष आणखी तीव्र होईल अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल यांचं निधन
- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचं मंगळवारी निधन झालं. ते ९५ व्या वर्षांचे होते. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने प्रकाश सिंह बादल यांना एक आठवड्यापूर्वी मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
- प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे पुत्र आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केली. भटिंडा येथील बादल गावात प्रकाश सिंग बादल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव बुधवारी सकाळी मोहाली येथून बादल गावात आणण्यात येणार आहे.
- सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये फोर्टिस रुग्णालयाने म्हटलं होतं की, “प्रकाश सिंग बादल हे आयसीयूमध्ये उपचार घेत असून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आहेत.” प्रकाश सिंग बादल हे पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री बनले होते.
रुळांवर नव्हे पाण्यावर धावणार मेट्रो! पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा कंदील
- केरळमध्ये आजपासून (२५ एप्रिल) देशातली पहिली वॉटर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देशातील ही पहिलीच मेट्रो असेल जी रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. या प्रकल्पाद्वारे कोची आणि शहराच्या आसपासची बेटं जोडली जातील. हा प्रकल्प कोची आणि आसपासच्या लोकांसाठी आणि जगभरातील पर्यटकांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास प्रदान करेल.
- या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटींसह वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तर व्यित्तला-कक्कनड टर्मिनल प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील. माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.
जाणून घ्या भारताल्या पहिल्या वॉटर मेट्रोबद्दल
- रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपेक्षा वॉटर मेट्रो अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. लोकांची वाहतूक कोंडीपासून सुटका, प्रदूषण कमी होणार.
- पहिल्या टप्प्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटी धावणार
- वॉटर मेट्रोद्वारे कोची शहर आणि आसपासची १० बेटं जोडली जाणार
- या प्रकल्पाअंतर्गत आगामी काळात ३८ टर्मिनल्सवर ७८ इलेक्ट्रिक बोटी धावतील.
- पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल.
- केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, प्रवासी कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता अवघ्या २० मिनिटांपेक्षा कमी वेळात हायकोर्ट टर्मिनल ते वायपिन टर्मिनलपर्यंत पोहोचू शकतात.
- हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तिकीट असेल.
- व्यित्तला-कक्कनड टर्मिनलदरम्यान प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत: नेपोम्नियाशी-डिंगची 11व्या डावात बरोबरी
- रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत ११व्या डावात झटपट बरोबरी साधून ६-५ अशी आघाडी कायम राखून आपली बाजूही भक्कम केली. जागतिक अजिंक्यपद लढतीमध्ये १४ डावांत ७.५ गुण मिळवणारा विजेता ठरतो. नेपोम्नियाशीला यासाठी उर्वरित तीन फेऱ्यांमधून केवळ १.५ गुणांची आवश्यकता आहे. लढतीतील ११वा डाव ३९ चालींनंतरच बरोबरीत सोडवण्यात नेपोम्नियाशी आणि डिंग तयार झाले. हा डाव अवघा १ तास ४० मिनिटे चालला.
- पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोम्नियाशीने रुय लोपेझच्या ‘बर्लिन लाइन’ पद्धतीने डावाची सुरुवात केली. सुरुवातीच्या खेळानंतर नेपोम्नियाशी काहीसा विचलित झाला होता; पण डिंगही फार काही पुढाकार घेऊन खेळताना दिसत नव्हता. डाव पुढे जात असताना नेपोम्नियाशीने हळूहळू पुढाकार घेण्यास सुरुवात केली आणि पटावरील आपली स्थिती भक्कम केली. तुलनेत डिंग अधिक बचावात्मक खेळत गेला आणि त्यामुळे डिंगच्या खेळात एक प्रकारची निष्क्रियता आली.
- डावाच्या १५व्या चालीला डिंगने ‘सी४’ ही मोहऱ्यांची चाल अपेक्षेपेक्षा लवकर खेळली. या चालीपर्यंत नेपोम्नियाशीला फारशी संधी नव्हती. मात्र, या चालीने डिंगचा पटावरील कमकुवतपणा स्पष्ट झाला. या वेळी पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोला डिंगवर अधिक दबाव आणण्याची संधी होती. मात्र, नेपोम्नियाशीने तसे न करता पटावरील स्थिती अधिक सुलभ करण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर पटावर डाव अखेरच्या टप्प्यात आला आणि त्याच स्थितीत दोघांनी लढत बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २५ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २४ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २३ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २२ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २१ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |