Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 27 December 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२७ डिसेंबर चालू घडामोडी
जगातील सर्वाधिक लांबीचा चिखलदरा स्कायवॉक केव्हा पूर्ण होणार:
- विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे सुमारे ४०७ मीटर लांबीचा काचेचा पूल (स्कायवॉक) उभारला जात आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जगात स्वित्झर्लंड तसेच चीनमध्ये स्कायवॉक तयार करण्यात आला आहे.
- मात्र भारतातील हा स्कायवॉक सर्वाधिक लांबीचा असणार आहे. सिडकोच्या चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण असणार आहे. या प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळाची मंजूरी मिळाली असली, तरी केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
- या स्कायवॉकच्या मार्गात अनेक अडथळे आले आहेत, त्यामुळेच हा प्रकल्प केव्हा पूर्णत्वास जाणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.
इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवून न्यूनगंड निर्मिती – मोदी:
- ‘‘देशवासीयांत न्यूनगंड निर्माण करण्यासाठी दुर्दैवाने इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवल्या जात आहेत,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. भारताला यशोशिखरावर पोहोचवायचे असेल तर भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
- शीख गुरू गुरू गोविंदसिंग यांच्या पुत्रांचे हौतात्म्याबद्दल त्यांना आदरांजली व अभिवादन करण्यासाठी त्यांचा हौतात्म्यदिन ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. सोमवारी येथील ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’मध्ये पहिल्या वीर बाल दिनानिमित्त आयोजित सोहळय़ात मोदी बोलत होते. यावेळी सुमारे ३०० मुलांनी सादर केलेल्या कीर्तनात मोदी सहभागी झाले. यंदा गुरू गोविंदसिंग यांच्या प्रकाशपर्वानिमित्त ९ जानेवारी रोजी केंद्र सरकारने साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ पाळण्याचे जाहीर केले होते.
- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदींनी आपल्या धार्मिक श्रद्धांच्या रक्षणार्थ हुतात्मा झालेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र जोरावर सिंग व फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले, की हा दिवस आपल्या अभिमानास्पद भूतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व भविष्यासाठी प्रेरक म्हणून महत्त्वाचा आहे.
- मोदी म्हणाले की, औरंगजेब व त्याच्या माणसांना तलवारीच्या जोरावर गुरु गोविंदसिंग यांच्या पुत्रांचे धर्मातर करायचे होते. त्यांनी भारताच्या रुपांतराची कुटील योजना आखली होती. पण गुरू गोविंद सिंग या सर्वाविरुद्ध पहाडासारखे उभे राहिले. ज्या समाजाची व राष्ट्राची नवी पिढी अत्याचाराला बळी पडते, तिचा आत्मविश्वास व भवितव्य आपोआप नष्ट होते. पण हे भारतपुत्र मृत्यूपुढेही डगमगले नाहीत. या मुलांना भिंतीत जिवंत चिणण्यात आले. मात्र आपल्या हौतात्म्याने या पुत्रांनी अतिरेकी कुटील हेतूंना कायमचे दफन केले. त्यांच्या या महान शौर्यगाथेचे इतिहासात सोयीस्कर विस्मरण झाले. आताचा ‘नवा भारत’ काही दशकांपूर्वी करण्यात आलेल्या जुन्या चुका सुधारत आहे. इतिहासाच्या नावाखाली आपल्याला काल्पनिक कथा शिकवल्या गेल्या व आपल्यात न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आपल्या समाजाने व परंपरेने या गौरवगाथा विस्मृतीत जाऊ न देता जिवंत ठेवल्या.
कर्नाटकात शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहांत मुखपट्टी बंधनकारक:
- कर्नाटक सरकारने चित्रपटगृहे, शाळा आणि महाविद्यालयांत मुखपट्टीचा वापर अनिवार्य केला आहे. जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तसेच देशात ओमायक्रॉनचा उपप्रकार बीएफ.७ चा संसर्ग होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी करोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक आहे. हेच बंधन रेस्तराँ आणि पबमध्ये जाणाऱ्यांना असेल.
- या सर्व ठिकाणी नववर्ष साजरे करताना तेथील आसन क्षमतेप्रमाणेच प्रवेश दिला जाईल. तसेच त्यासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर आणखी एक तास ( म्हणजे १ जानेवारीच्या पहाटे १ वाजेपर्यंतच) ही ठिकाणे सुरू ठेवता येतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे नववर्षांनिमित्त जेथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी होईल, तेथे सर्वाना मुखपट्टी बंधनकारक असेल. अशा ठिकाणी लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जाऊ नये, अशी सूचना सरकारने केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर आणि महसूल मंत्री तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रभारी आर. अशोक यांच्या उपस्थितीत झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- देशभरात आज रुग्णालयीन सराव – केंद्र सरकारने करोनाप्रतिबंधासाठी खबरदारीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालयीन यंत्रण सज्ज ठेवण्यासाठी मंगळवारी देशात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत रुग्णालयीन उपचारांसाठी सराव कार्यक्रम राबविला जाणार आहे. येथील सफदरजंग रुग्णालयातील सरावाची पाहणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया करणार आहेत. त्यांनी सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तज्ज्ञांची बैठक घेतली.
- ब्रिटनमध्ये नव्या वर्षांत करोना आकडेवारीची प्रसिद्धी बंद – ब्रिटन नवीन वर्षांपासून करोना प्रादुर्भावासंदर्भातील नियमित प्रारूप आकडेवारी प्रकाशित करणे थांबवणार आहे. औषधे व प्रतिबंधक लसीकरणाद्वारे करोनाच्या विषाणू प्रतिबंधाच्या उपाययोजना करत करोनासह जगणे सुरू करण्याचा टप्पा देशाने गाठला आहे. त्यामुळे ही आकडेवारी प्रसिद्ध करणे इथून पुढे गरजेचे नसल्याचे ब्रिटनच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. हंगामी फ्ल्यूसारख्या आजाराप्रमाणे करोना विषाणूवर उपाययोजना केल्या जातील.
नेपाळमध्ये प्रचंड यांना पंतप्रधानपदाची शपथ; तिसऱ्यांदा सूत्रे:
- नेपाळमध्ये पुष्प कमल दहल ऊर्फ ‘प्रचंड’ यांनी सोमवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. रविवारी नाटय़मय राजकीय घडामोडींत प्रचंड हे नेपाळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील निवडणूकपूर्व आघाडीतून बाहेर पडले होते.
- त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते के.पी. शर्मा ‘ओली’ यांच्याशी हातमिळवणी केली. प्रचंड व ओली यांनी सरकारचे नेतृत्व आलटून पालटून करण्याचे मान्य केले. ओली यांनी प्रचंड यांना पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेण्यास संमती दिली आहे.
- ६८ वर्षीय प्रचंड यांना नेपाळच्या २७५ सदस्यीय प्रतिनिधिगृहात १६९ सदस्यांचा पाठिंबा आहे. तसा दावा करणारे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना सादर केल्यानंतर त्यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. राष्ट्रपती कार्यालय ‘शीतल निवास’ येथे झालेल्या अधिकृत शपथविधी सोहळय़ात राष्ट्रपती भंडारी यांनी प्रचंड यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
- नवीन मंत्रिमंडळात तीन उपपंतप्रधान आहेत. ‘सीपीएन-यूएमएल’चे विष्णू पौडेल, ‘सीपीएन-माओवादी सेंटर’चे नारायण काजी श्रेष्ठ आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) रवी लामिछाने याची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली.
भारतीय महिला क्रिकेट संघाने तीनपैकी दोन स्पर्धेत फडकवला तिरंगा, पाहा कामगिरी:
- २०२२ हे वर्ष आता शेवटच्या वळणावर आले आहे. या वर्षी भारतासाठी क्रीडा क्षेत्रात अनेक विशेष संधी आल्या, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी जगभर आपला झेंडा फडकावला आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठीही हे वर्ष खूप चांगले होते. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावर्षी तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये काही ठिकाणी इतिहास रचला तर काही ठिकाणी निराशा पदरी आली.
- भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच रौप्यपदक जिंकणे ऐतिहासिक ठरले – कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा सामना केला. ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने हा सामना जिंकला नाही, पण मन नक्कीच जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघ निश्चितपणे अंतिम सामना हरला, पण तरीही प्रथमच महिला क्रिकेटमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना १६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १९.३ षटकात १५२ धावांवर सर्वबाद झाला.
- भारतीय महिला संघाने विक्रमी सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले – भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी करत आशिया कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. सिल्हेत येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघाने विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे महिला आशिया चषकाचे आतापर्यंत केवळ ८ हंगाम झाले आहेत. म्हणजेच एक हंगाम सोडला, तर प्रत्येक वेळी भारतीय संघ चॅम्पियन ठरला आहे.
बाबर आझमने पाकिस्तानसाठी रचला इतिहास; युसूफचा १६ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम मोडला:
- पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कराची नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार बाबर आझमने या सामन्यात मोठी इतिहास रचला आहे. किवी संघाविरुद्धच्या सामन्यात बाबरने १३ धावा करताच, तो एका वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
- बाबर आझमने २०२२ मध्ये आतापर्यंत ४४ सामन्यांमध्ये ५२.६७ च्या सरासरीने २४२३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ शतके आणि १७ अर्धशतक झळकवली आहेत. बाबरने आज १३ धावा करताच मोहम्मद युसूफचा विक्रम मोडला आहे. मोहम्मद युसूफने २००६ मध्ये ३३ सामन्यांत ६९.५७च्या सरासरीने २४३५ धावा केल्या होत्या. युसूफने या काळात ९ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली होती.
- दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे झाले, तर हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर आहे. डावखुऱ्या फलंदाजाने २०१४ मध्ये २८६८ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१७ मध्ये किंग कोहलीच्या बॅटमधून २८१८ धावा निघाल्या होत्या.
- सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २७ षटकांत ३बाद धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बाबर आझम ४७ आणि सौद शकिलने १४ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना मायकेल ब्रेसवेलने दोन आणि अझाज पटेलने १ विकेट घेतली.
लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धा – रुद्रांक्ष पाटीलला जेतेपद:
- ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने १२व्या आरआर लक्ष्य चषक अखिल भारतीय अव्वल २० आमंत्रितांच्या १० मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नवी मुंबई येथे रंगलेल्या या एकदिवसीय स्पर्धेची शनिवारी उशिराने सांगता झाली.
- या महिन्याच्या सुरुवातीला भोपाळ येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या रुद्रांक्षने लक्ष्य चषकात चमकदार कामगिरी केली. पहिल्या दोन फेऱ्यांतच त्याने अव्वल स्थान मिळवले.
- त्याने आपले वर्चस्व टिकवताना २५१.८ गुणांसह वरिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले आणि एक लाख रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. खुल्या गटातील या स्पर्धेत नौदलाच्या किरण जाधव आणि उत्तर प्रदेशच्या आयुषी गुप्ताने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
- गतविजेत्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत २०१८च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या शानु मानेने ६२९.६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले; पण अंतिम फेरीत तो पाचव्या स्थानी राहिला.
विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी ; राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा निर्णय:
- राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशातही नोकरी करता येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने नुकताच यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करून शिक्षण पूर्ण केल्यावर भारतात सेवा देण्याची अट रद्द केली आहे. त्यामुळे विदेशात नोकरीच्या संधीचा अनेकांना याचा लाभ होणार आहे.
- परदेशी शिक्षणाच्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदेशात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतात येऊन सेवा देणे आवश्यक होते. या अटीमुळे उच्च शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी करता येत नव्हती. यामुळे शासनाने या निर्णयात बदल करावा अशी मागणी विविध स्तरातून होत होती.
- यावर सामाजिक न्याय विभागाने सकारात्मक निर्णय घेत तब्बल एकोणवीस वर्षांनंतर ही अट रद्द करून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विदेशातही नोकरी करण्याची मुभा दिली आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ही नोकरीची संधी घेताना त्यांना ‘पोस्ट स्टडी वर्क व्हीसा’ हा दोन वर्षांसाठी दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारतात येऊन सेवा द्यावी लागणार आहे.
स्वसंरक्षणासाठीच ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन- संरक्षणमंत्री:
- कुणावर हल्ला करण्यासाठी नव्हे, तर आमच्या देशावर वाकडी नजर टाकण्याचे कुणाचे धाडस होऊ नये यासाठी भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचे उत्पादन करू इच्छितो, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.
- ‘आम्ही ज्यांचे उत्पादन करत आहोत, ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे कुठल्याही देशावर हल्ला करण्यासाठी नाहीत. एखाद्या देशावर हल्ला करणे किंवा कुठल्याही देशाची एक इंचही भूमी बळकावणे हे कधीच भारताच्या स्वभावात नव्हते. कुणाची आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत होऊ नये यासाठी आम्ही भारतात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करत आहोत’, असे अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राच्या संदर्भात राजनाथ सिंह म्हणाले.
- जगातील कुठल्याही देशाने आमच्यावर हल्ला करू नये यासाठी भारताकडे आण्विक दहशत असायला हवी आणि आम्ही हे दाखवून दिले आहे, असे येथील ब्रह्मोस उत्पादन केंद्रातील डिफेन्स टेक्नॉलॉजीज अँड टेस्ट सेंटरच्या भूमिपूजन समारंभानंतर केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले.
- भारतात दहशतवादी हल्ले करत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर टीका केली. त्या देशाने उरी व पुलवामात हल्ले केले. त्यानंतर आमच्या पंतप्रधानांनी एक निर्णय घेतला आणि आम्ही त्या देशाच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले. ज्या वेळी हवाई हल्ल्यांची आवश्यकता होती, तेव्हा तेही आम्ही यशस्वीरीत्या केले, असे राजनाथ म्हणाले. ‘कुणी आमच्यावर वाकडी नजर टाकण्याची िहमत केली, तर केवळ सीमेच्या या बाजूलाच नाही, तर पलीकडे जाऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला करू शकतो असा संदेश आम्ही दिला. ही भारताची ताकद आहे’, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
डेस्मंड टुटू यांचे निधन:
- दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे अध्वर्यू आणि देशातील वांशिक पक्षपाताविरुद्ध दिलेल्या लढय़ासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
- अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी टुटू यांचे पहाटे केपटाऊनमध्ये निधन झाल्याचे जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेतील सध्या हयात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी ते अखेरचे होते.
- पूर्वी क्षयरोगातून बरे झालेल्या टुटू यांच्यावर १९९७ साली प्रोस्टेट कँसरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अलीकडच्या वर्षांमध्ये त्यांना अनेक आजारांसाठी अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
- दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू व कार्यकर्ते असलेले डेस्मंड टुटू यांना वर्णभेदविरुद्ध अिहसक लढा दिल्याबद्दल १९८४ साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. देशातील अल्पसंख्याक गोऱ्यांच्या ज्या राजवटीविरुद्ध त्यांनी लढा दिला, त्याचा एक दशकानंतर शेवट झाल्याचे त्यांनी पाहिले. त्या राजवटीच्या काळय़ा दिवसांत झालेल्या अत्याचारांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचे ते अध्यक्ष होते. देशातील कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय असे दोन्ही लोक त्यांना मानत.
‘हे वर्षही आपल्यापैकी अनेकांना खडतर गेलं पण मी…’; रतन टाटांची पोस्ट चर्चेत:
- मागील काही काळापासून करोनाने जगातील सर्वच लोकांचं वेळापत्रक बदललं आहे. अनेक प्लॅन विस्कटले आहेत आणि नव्याने गोष्टींचं नियोजन करावं लागलं. मात्र, त्यातही करोनाच्या नव्या विषाणूंमुळे त्यातही बदल करण्याची वेळ येते.
- नवे निर्बंध लागतात आणि त्यामुळे नव्याने ठरवलेले प्लॅन देखील पुन्हा बदलण्याची गरज पडते. त्यामुळेच प्रत्येकासाठी हा करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये सर्वांना सणाच्या आणि आगामी काळाच्या शुभेच्छा देतानाच या परिस्थितीवर आपली भावना व्यक्त केली.
- रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मागील आणखी एक वर्ष आपल्यापैकी बहुतेक जणांना कठीण गेलं. पण मला मात्र हा वेळ सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी घ्यायचा आहे. मला आशा आहे की पुढे येणारा काळ जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी चांगलं आरोग्य आणि खूप सारा आनंद घेऊन येईल.”
- दरम्यान, जगभरात ओमायक्रॉन विषाणूने आरोग्य विभागाची काळजी वाढवली आहे. करोनाचा हा नवा विषाणू झपाट्याने जगात पसरत आहे. त्याचा संसर्गाचा वेग पाहता अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सणांच्या उत्सवावरही मर्यादा आल्या आहेत.
ओमायक्रॉनचा देशातील १७ राज्यांमध्ये झाला प्रसार, एकूण रुग्णसंख्या ४२२ वर:
- देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. ही घट केवळ नवीन आढळणाऱ्या रुग्णांचीच नाही तर सक्रिय रुग्णसंख्येतही झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ६,९८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७ हजार ९१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- देशात आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ३० हजार ३५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ७६ हजार ७६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ४ लाख ७९ हजार ६८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण १४१.३७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
- देशात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढू लागले आहेत. देशातील १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त १०८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत ७९ असून त्यापैकी २३ जण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये ४३ रुग्ण असून त्यापैकी १० जण बरे झाले आहेत. तेलंगाणामध्ये ४१, तामिळनाडूमध्ये ३८, केरळमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २६ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २५ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २४ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २३ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २२ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |