Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |28 April 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२८ एप्रिल चालू घडामोडी
आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत
- भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अनुभवी खेळाडू किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पुरुष दुहेरीतील भारताची तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीनेही पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
- सिंधूने चीनच्या हान युएइला २१-१२, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या सिंधूने हानविरुद्ध वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला गेम २१-१२ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने हीच लय कायम राखली. हानने काही चांगले फटके मारून गुण मिळवले. मात्र, सिंधूने खेळ उंचावल्यावर हानचा निभाव लागला नाही.
- सिंधूसमोर पुढील फेरीत कोरियाच्या दुसऱ्या मानांकित आन से यंगचे आव्हान असेल. आठव्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वी वाडरेयोला एक तासाहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात २१-१६, ५-२१, २१-१८ असे पराभूत केले. पुढच्या फेरीत त्याची गाठ जपानच्या केंटा सुनेयामाशी पडेल. श्रीकांतने चौथ्या मानांकित जपानच्या कोडाई नारोकाविरुद्ध १४-२१, २२-२०, ९-२१ अशी हार पत्करली.
- पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीने कोरियाच्या जिन यंग व ना सुंग सेउंग जोडीला २१-१३, २१-११ असे नमवत पुढची फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित मोहम्मद एहसान व हेंद्र सेतिआवान जोडीशी होईल. रोहन कपूर व सिकी रेड्डी जोडीला मिश्र दुहेरीत पुढे चाल मिळाली. आता पुढच्या फेरीत त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या देजान फर्डिनानसिया व ग्लोरिया इमानुएल विदजाजा जोडीचे आव्हान असेल. बी सुमित रेड्डी व अश्विनी पोनप्पा जोडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी होतेय एक प्रसूती
- देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी सरासरी एका महिलेची प्रसूती होत आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वे गाड्यांमध्ये १५८ प्रसूती झाल्या असून, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे. याचवेळी रेल्वेच्या आवारात झालेल्या प्रसूतींची संख्या २२० आहे.
- रेल्वेने मागील वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. रेल्वे, रेल्वेच्या मालमत्ता आणि प्रवाशांचे संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी आरपीएफवर आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर रेल्वेकडून लक्ष दिले जात आहे. यासाठी ८६४ रेल्वे स्थानके आणि रेल्वेच्या ६ हजार ६४६ डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या गर्भवतींची संख्याही जास्त आहे. रेल्वे गाड्यांमध्ये त्यांची प्रसूती होण्याच्या १५८ घटना मागील वर्षी घडल्या. याचबरोबर रेल्वे स्थानकांसह आवारामध्ये २०० जणींची प्रसूती झाली. यासाठी आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली.
- आरपीएफने मागील वर्षी ८७३ पुरुष आणि ५४३ महिला प्रवाशांचा जीव वाचवला आहे. फलाट, लोहमार्ग आणि गाड्यांमध्ये आरपीएफने प्रवाशांना हे जीवदान दिले आहे. प्रवाशांच्या विसरलेल्या तब्बल ५० कोटी रुपयांच्या वस्तू आरपीएफने जमा केल्या. त्या नंतर खातरजमा करून प्रवाशांना परत करण्यात आल्या. तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या ४ हजार २८० जणांना मागील वर्षी अटक करण्यात आली.
चारधामला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! Reliance Jio ने लॉन्च केले 5G नेटवर्क; मिळणार ‘हा’ फायदा
- सध्या भारतात रिलायन्स जिओ , एअरटेल या दोन लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५जी नेटवर्क सेवा सुरु केली आहे. तसेच आता जिओने आणखी एक नवीन विक्रम केला आहे. रिलायन्स जिओने देवभूमी उत्तराखंडच्या चारधाम – बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर संकुलात आपली ट्रू 5G सेवा सुरू केली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या निमित्ताने Jio ची 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. आता देशभरातून चारधामला पोहोचणाऱ्या लाखो भाविकांना 5G च्या अल्ट्रा हाय स्पीडचा लाभ मिळणार आहे.
- केदारनाथ धाम यात्रा २०२३ नुकतीच सुरु झाली आहे. केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यात आहे. अशा स्थितीत दरवर्षी भारतातील विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो भाविक केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचीवर असल्याने हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. यंदा २२ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
- बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी रिलायन्स जिओच्या 5G सेवेचे उद्घाटन केले. Jio True 5G लॉन्च प्रसंगी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले , “रिलायन्स जिओने उत्तराखंडमधील चारधाम परिसरामध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. राज्याच्या डिजिटल क्रांतीमध्ये बदल घडवून आणण्याबद्दल जिओचे आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो.”व्हिडिओमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले, “या सुविधेमुळे, राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या लाखो यात्रेकरूंना हायस्पीड डेटा नेटवर्कचा लाभ घेता येईल.
- उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून भारत-तिबेट सीमेवरील उत्तराखंडमधील पहिले भारतीय गाव माना पर्यंत रिलायन्स जीओचे नेटवर्क पसरलेले आहे. राज्यात जिओ हे एकमात्र ऑपरेटर असे आहे ज्याचे नेटवर्क सर्व चारधाममध्ये, केदारनाथ धमाच्या ट्रेकमार्गावर आणि १३,६५० मित्र उंचीवर असलेल्या श्री हेमकुंड साहिब गुरुद्वारामध्ये उपलब्ध आहे.
‘प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणण्याचे उद्दिष्ट’
- सुदानमधील सुरक्षाविषयक परिस्थिती अद्यापही अतिशय गुंतागुंतीची व अस्थिर असून, त्या देशात अडकून पडलेल्या प्रत्येक भारतीयाला सुखरूप परत आणणे हे भारताचे उद्दिष्ट आहे, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी सांगितले.
- भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत अंदाजे १७०० ते दोन हजार भारतीय नागरिकांना सुदानमधील संघर्षग्रस्त भागातून हलवण्यात आले आहे. यात सुदानमधून पूर्वीच हलवण्यात आलेले नागरिक, तसेच राजधानी खार्तुमहून पोर्ट सुदानच्या वाटेवर असलेले नागरिक यांचा समावेश आहे, अशी माहिती क्वात्रा यांनी पत्रकारांना दिली.
- भारत सुदानमधील दोन्ही लढाऊ गटांच्या व इतर संबंधितांच्या संपर्कात असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आपल्या नागरिकांना हलवण्यात यशस्वी ठरला आहे. भारत सुदानसोबत बळकट अशा विकासात्मक भागीदारीच्या बाजूने असल्याची त्यांना जाणीव आहे, असेही परराष्ट्र सचिवांनी सांगितले.
- ‘सुदानच्या भूमीवरील परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची, अस्थिर व अकल्पित आहे. सुदानी सशस्त्र दल आणि रॅपिड सपोर्ट फोर्स या दोघांच्याही आम्ही संपर्कात राहिलेलो आहोत. आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. भारतीयांना संघर्षग्रस्त भागांतून सुरक्षित भागांत आणि नंतर पोर्ट सुदनला हलवण्यासाठी आम्ही सर्व बाजूंच्या संपर्कात आहोत’, असे क्वात्रा म्हणाले. सुदानमधून भारतात जाण्यास इच्छुक असलेल्या भारतीयांपैकी सुमारे ३१०० लोकांनी राजधानी खार्तुममधील भारतीय राजदूतावासात नोंदणी केली आहे, तर आणखी ३०० लोक दूतावासाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली.
जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
- ओबीसी जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी राजश्री शाहू महाराज स्मृति शताब्दीनिमित्त झालेल्या सामाजिक न्याय परिषदेत करण्यात आली.दिल्ली व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील संघटनांनी एकत्र येऊन या परिषदेचे आयोजन केले होते.
- शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणावर केंद्र सरकारने सहा टक्के खर्च करण्याची गरज असून सर्वाना मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे. केंद्राने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण व प्रोत्साहन देणारे कायदे करावेत. खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, असे ठरावही परिषदेत करण्यात आले.
- ‘भाकप’चे महासचिव डी. राजा यांनी, आरक्षणाचा आधार केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक विषमता आहे. शाहू महाराजा वारसा चालवत विद्यमान केंद्र सरकारने ही विषयमता दूर केली पाहिजे, असे सांगितले. शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सामाजिक न्यायाची धोरणे राबवून मागास जातींना आरक्षण दिले. आंतरजातीय विवाहाचा कायदा केला.
- आता मात्र वैद्यकीय शिक्षणातील ओबीसींचा कोटा हिरावून घेतला जात असल्याची टीका द्रमुकचे खासदार पी. विल्सन यांनी केली. या परिषदेला ‘आप’चे खासदार राजेंद्र पाल गौतम, जेएनूयूचे प्रा. मिलिंद आव्हाड, प्रा. हरीश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्यां शबनम हाश्मी, ‘भाकप’चे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो आदी उपस्थित होते.
IPL: आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा आणि फक्त आमच्यासाठी खेळा; इंग्लंडच्या सहा खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून मोठी ऑफर, जाणून घ्या
- आयपीएलच्या अव्वल संघांच्या मालकांनी सहा इंग्लिश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून एक वर्षासाठी टी२० लीग खेळण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ‘टाइम्स लंडन’च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. वृत्तानुसार, अनेक फ्रँचायझी खेळाडूंना वर्षभराच्या करारावर साईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या करारानुसार खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये खेळावे लागणार आहे. आयपीएल व्यतिरिक्त, यात वेस्ट इंडिजची सीपीएल, दक्षिण आफ्रिका टी२० लीग, यूएईची ग्लोबल टी२० लीग आणि अमेरिकेत होणारी टी२० लीग देखील समाविष्ट आहे. या सर्व लीगमध्ये १० आयपीएल फ्रँचायझींपैकी अनेक संघ आहेत. तथापि, अहवालात कोणत्या खेळाडूंना कोणत्या फ्रेंचायझीने संपर्क साधला आहे हे स्पष्ट केलेले नाही.
- अहवालात असे म्हटले आहे की जर एखाद्या खेळाडूने हा करार स्वीकारला तर त्याची जबाबदारी आणि उत्तर देण्याचे दायित्व हे आयपीएल फ्रँचायझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुढे असेल. या खेळाडूला त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फ्रेंचायझीकडून परवानगी घ्यावी लागेल. सध्या फुटबॉलमध्ये हेच घडत आहे. त्याच वेळी, क्रिकेटमध्ये, प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डानुसार खेळतात आणि टी२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाची परवानगी घेतात.
- टी२० क्रिकेटची लोकप्रियता खूप जास्त आहे आणि टी१० या नवीन प्रकारातही प्रेक्षकांची आवड वाढत आहे. एका वर्षात एक खेळाडू किती टी२० लीगमध्ये भाग घेऊ शकतो याचा नियम आयसीसी तयार करण्याचा विचार करत आहे, परंतु सध्या असा कोणताही नियम नाही. तथापि, अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकाली निवृत्ती घेऊन पैसे कमावण्यासाठी टी२० लीग खेळण्यासाठी पसंती दर्शवतात. सध्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि गप्टिल सारख्या खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे केंद्रीय करार टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी सोडले आहेत.
- या प्रकरणी अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क साधण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणी इंग्लंडच्या खेळाडूंची चर्चा झाली आहे. एका वर्षाच्या करारासाठी खेळाडूंना २०-५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, जी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून केंद्रीय करार मिळवणाऱ्या अव्वल खेळाडूंपेक्षा पाचपट जास्त आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २७ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २६ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २५ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २४ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
- २३ एप्रिल २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |