Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |3 November 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
३ नोव्हेंबर चालू घडामोडी
सचिन तेंडुलकरचा १६ वर्षे जुना विश्वविक्रम मोडण्यासाठी विराट सज्ज, फक्त ‘इतक्या’ धावांची आहे गरज
- विराट कोहलीसाठी २०२३ चा विश्वचषक आत्तापर्यंत चांगलाच ठरला आहे. या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता, आता हे विसरून विराटला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळायला आवडेल. त्याचवेळी, श्रीलंकेसोबतच्या आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर भारताचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकरचा खास विक्रम आहे. विराट हा विक्रम मोडण्यापासून फक्त ३४ धावा दूर आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा हजार धावा करण्याचा विक्रम –
- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १००० धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सात वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात सात वेळा एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. या वर्षी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६६ धावा केल्या आहेत.
विराटने एक हजार धावा कधी-कधी केल्या आहेत?
- वर्ष २०११: ३४ सामन्यांमध्ये ४७.६२च्या सरासरीने १३८१ धावा (४ शतके आणि ८ अर्धशतके)
- वर्ष २०१२: १७ सामन्यात ६८.४०च्या सरासरीने १०२६ धावा (५ शतके आणि ३ अर्धशतके)
- वर्ष २०१३: ३४ सामन्यात ५२.८३ च्या सरासरीने १२६८ धावा (४ शतके आणि ७ अर्धशतके)
- वर्ष २०१४: २१ सामन्यांमध्ये ५८.५५ च्या सरासरीने १०५४ धावा (४ शतके आणि ५ अर्धशतके)
- वर्ष २०१७: २६ सामन्यांमध्ये ७६.८४ च्या सरासरीने १४६० धावा (६ शतके आणि ७ अर्धशतके)
- वर्ष २०१८: १४ सामन्यात १३३.५५ च्या सरासरीने १२०२ धावा (६ शतके आणि ३ अर्धशतके)
- वर्ष २०१९: २६ सामन्यांमध्ये ५९.८६ च्या सरासरीने १३७७ धावा (५ शतके आणि ७ अर्धशतके)
धर्माचे अधिष्ठान दिल्यास नव्या संस्कृतीची ओळख ; राज्यपालांचे प्रतिपादन
- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या पुढाकाराने राजभवनात छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा , कर्नाटक, केरळ, पंजाब व तमिळनाडू या राज्यांचा तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन बुधवारी साजरा करण्यात आला. धर्माचे अधिष्ठान दिल्यास वेगवेगळय़ा राज्यांतील नव्या संस्कृतीची ओळख होईल, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.
- राज्यपाल म्हणाले की, आद्य शंकराचार्यानी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळय़ा दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास लोक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून त्यांना नव्या संस्कृतीची ओळख होईल.
- ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम देखील प्रत्येक राज्याने इतर राज्यांची संस्कृती जाणून घ्यावी, या हेतूने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सुमन तलवार, चित्रोत्पला लोक कला परिषदेचे संचालक राकेश तिवारी, तेलुगू कला समितीचे एम.के. रेड्डी आणि कुचीपुडी नृत्यांगना नादिया यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांना दरमहा ४,००० पर्यंत लाभ शक्य! राहुल गांधी यांचे तेलंगणात आश्वासन
- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली तर महिलांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकेल, असे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सामाजिक पेन्शन, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर बचत आणि सरकारी बसमधून मोफत प्रवास दिला जाईल असे राहुल म्हणाले.
- तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाच्या मेदिगड्डा धरणाजवळ अंबातीपल्ली येथे महिलांच्या मेळाव्यात बोलताना राहुल यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये बीआरएस सरकारने १ लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कथितरीत्या ‘लुटलेला’ सर्व पैसा लोकांना परत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे तेलंगणातील महिलांना सर्वाधिक फटका बसला, असा आरोपही राहुल यांनी केला.
- चार हजार रुपयांचा हिशेब मांडताना राहुल यांनी सांगितले की, सामाजिक पेन्शन म्हणून महिलांच्या बँक खात्यात दरमहा २,५०० रुपये जमा केले जातील. सध्या एक हजार रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिला जाईल आणि सरकारी बसमध्ये प्रवास करून दरमहा एक हजार रुपये वाचतील, अशा प्रकारे महिलांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो असे ते म्हणाले.
पडत्या रुपयाची नीचांकी लोळण
- डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली असून रुपयाने ८३.३३ असा नवीन नीचांक बुधवारी नोंदविला. डॉलरमागे आणखी ९ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८३.३५ ही नीचांकी पातळी दिवसातील व्यवहारात गाठली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे. याचबरोबर पश्चिम आशियातील भू-राजकीय अनिश्चिततेमध्ये खनिज तेलाच्या किमती वाढल्याने जगभरातील भांडवली बाजारावर त्याचे पडसाद उमटले आहेत.
- आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८३.२६ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८३.३३ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८३.३५ पातळीपर्यंत गडगडले होते. मंगळवारच्या सत्रात रुपया ८३.२४ या पातळीवर स्थिरावले होते.
- जगभरात सर्वत्रच बडय़ा गुंतवणूकदारांची जोखीमयुक्त मालमत्तांमधून माघार सुरू असून, तुलनेने सुरक्षित पर्यायांकडे त्यांचा पैसा वळला आहे. परिणामी सर्वच प्रमुख जागतिक चलनांचा मूल्य ऱ्हास सुरू आहे. अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरात सुरू असलेली उसळी हे अमेरिकी डॉलरला मिळत असलेल्या मजबुतीचेच प्रतिबिंब आहे.
ब्राझीलच्या साखरेचा जगाला दिलासा…जाणून घ्या कसे?
- ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे गाळप हंगाम महिनाभर लांबण्याचा अंदाज आहे. यंदा ब्राझीलचे साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. एल निनोमुळे जगभरातील अन्य देशांत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक साखर बाजाराला ब्राझीलमधील उत्पादनामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
- आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) दिलेल्या माहितीनुसार यंदा ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली आहे. साखर उताराही चांगला मिळत आहे. सामान्यपणे नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलमधील गाळप हंगाम संपतो. यंदा तो एक महिना जास्त म्हणजे डिसेंबरअखेर चालण्याचा अंदाज आहे. मागील दोन वर्षे ब्राझील दुष्काळाच्या समस्येला सामोरे जात होता. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होत होता. मागील वर्षी ब्राझीलचे साखर उत्पादन ३८० लाख टनांवर थांबले होते. यंदा ४२०. ६० लाख टनांहून जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
- जागतिक साखर बाजारात तुटीची शक्यता जागतिक साखर संघटनेने व्यक्त केली आहे. यंदा जागतिक साखर बाजारात ४०.३६ लाख टन साखरेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जगभरात दर वर्षी सुमारे १६६८.९७० लाख टन साखरेचा वापर होतो. यंदा एल निनोमुळे आशियाई देशात साखर उत्पादनात घटीचा अंदाज आहे. थायलंडमध्ये दर वर्षी सुमारे ११० लाख टन उत्पादन होते. यंदा उत्पादन ८० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. एल निनोसह अन्य कारणांमुळे भारत, चीन, थायलंड, अमेरिका आणि युरोपीय देशांत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज जागतिक साखर संघटनेने व्यक्त केला आहे.
- साखर उत्पादन करणाऱ्या जगातील आघाडीच्या दहापैकी सहा देशांतील साखर उत्पादनाला एल निनोचा फटका बसणार आहे. ब्राझीलमधील साखर उत्पादनाचे आकडे दिलासादायक आहेत. यंदा ब्राझीलचे साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज जागतिक साखर संघटनेने (आयएसओ) व्यक्त केला आहे.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- १ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- ३१ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- ३० ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
- २९ ऑक्टोबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |