Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 6 December 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
६ डिसेंबर चालू घडामोडी
भारत-जर्मनीदरम्यान गतिशीलता भागीदारी करार:
- भारत आणि जर्मनीने सोमवारी उभय देशांतील नागरिकांना दोन्ही देशांत शिक्षण, संशोधन व काम करण्यास सुलभता येण्यासाठी उपयोगी स्थलांतर गतिशीलता भागीदारी करारावर (मायग्रेशन अॅण्ड मोबिलिटी पार्टनरशिप अॅग्रिमेंट) स्वाक्षरी केली.
- या वेळी उभय देशांतील परराष्ट्रमंत्र्यांत भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील देशांचे प्रश्न, युक्रेन संघर्ष, अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानशी संबंधित मुद्दे आणि सीरियातील परिस्थिती यांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर विचारविनिमय झाला.
- ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरही या वेळी चर्चा झाली.
- भारताने जी-20 गटाचे अध्यक्षपद चार दिवसांपूर्वी स्वीकारले.
- या पार्श्वभूमीवर बेयरबॉक दोन दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी भारतात आल्या आहेत.
एमबाप्पेने मोडला 60 वर्ष जुना विक्रम:
- फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्रत्येक सामन्यात नवनवीन विक्रम करत आहे.
- फिफा विश्वचषक 2022 च्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात, त्याने पोलंडविरुद्ध दोन गोल केले आणि आपल्या संघाला 3-1 ने विजय मिळवून दिला.
- या विजयासह फ्रेंच संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आणि एमबाप्पेने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
- त्याने फिफा विश्वचषकात गोल करण्यात रोनाल्डोला मागे टाकले आणि मेस्सीची बरोबरी केली.
- याशिवाय एमबाप्पेने पेलेचा विक्रमही मोडला.
- तो या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे आणि त्याने पेलेचा 60 वर्ष जुना विक्रमही मोडला आहे.
- वयाच्या 24व्या वर्षी तो फिफामध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.
- यासोबतच त्याने मॅराडोना आणि पेलेसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.
शफाली युवा महिला संघाची कर्णधार:
- सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारीदरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’ 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
- अखिल भारतीय महिला निवड समितीने 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेशिवाय 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची निवड केली.
- 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभाग नोंदवणार असून भारत दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंडसह ड-गटात आहे.
- या स्पर्धेतील अंतिम सामना 29 जानेवारीला पार पडेल.
- शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

पाकिस्तानमध्ये २२ वर्षांनी इंग्लंडने नोंदवला विजय; यजमानांवर ७४ धावांनी केली मात:
- पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज रावळपिंडी येथे पार पडला. यासामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर इंग्लंडने २२ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंडने कसोटी सघांने तसेच बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली अजेय राहण्याची मालिका कायम ठेवली आहे.
- प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. त्यामुळे इंग्लंड संघानी ७४ धावांनी विजय मिळवला.
- पहिल्या डावात इंग्लंडडून चार फलंदाजांनी शतके झळकावली. यामध्ये जॅक क्रोली (१२२), बेन डकेट (१०७), ऑली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (१५३) यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ११४, इमाम-उल-हकने १२१ धावा आणि कर्णधार बाबर आझमने १३६ धावा केल्या. अशाप्रकारे दुसऱ्या डावात इंग्लंड ७८ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला.
मुक्त आणि आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी श्रेणीबद्ध विद्यापीठांनाही पूर्वपरवानगी बंधनकारक:
- देशभरातील श्रेणीबद्ध स्वायत्तता (ग्रेडेड ऑटॉनॉमी) प्राप्त विद्यापीठांना मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजीसीने २०१८ मधील नियमावलीमध्ये दुरुस्ती करून श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मान्यता घेण्याचा नियम समाविष्ट केला असून, त्याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- उच्च शिक्षणासंदर्भात यूजीसीकडून अलीकडे काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यात आता श्रेणीबद्ध विद्यापीठांच्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांबाबतही महत्त्वपूर्ण बदलाचीही भर पडली आहे. श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत यूजीसीने २०१८मध्ये नियमावली केली होती. त्या नियमावलीनुसार श्रेणीबद्ध विद्यापीठांना यूजीसीच्या मान्यतेशिवाय मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम थेट सुरू करण्याची मुभा होती.
- केवळ संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक बाबींची पूर्तता विद्यापीठांनी करणे आवश्यक होते. आता या नियमात यूजीसीकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता श्रेणीबद्ध विद्यापीठांनाही मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेणीबद्ध स्वायत्ततेअंतर्गत २०१९पासून दूरशिक्षण अभ्यासक्रम थेट सुरू केले आहे.
- श्रेणीबद्ध विद्यापीठांना मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीच्या खुल्या मान्यतेमुळे यूजीसीकडे काही अभ्यासक्रमांची नोंदणी झालेली नसल्याचा प्रकार घडलेला असू शकतो. त्यामुळे हा बदल यूजीसीकडून करण्यात आल्याची शक्यता आहे. दूरशिक्षण अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी हा बदल स्वागतार्ह असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी नव्या नियमाबाबत मांडले.
अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची ट्रम्प यांची मागणी:
- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा गैरप्रकार व फसवणूक झाल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, या आरोपांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या मागणीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ’ या एका समाजमाध्यमावर या संदर्भात मजकूर प्रसृत केला आहे.
- ‘ट्विटर’चे नवे मालक व अब्जाधीश उद्योगपती इयॉन मस्क यांनी तत्कालीन अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार जो बायडेन यांचा पुत्र हंटर बायडेन याच्या अनिर्बंध वर्तणुकीसंदर्भात पूर्वीच्या ‘ट्विटर’ व्यवस्थापनाने गाळलेल्या माहितीसंदर्भातील कंपनीचे अंतर्गत ‘ई मेल’च्या छाननीसाठी एका पत्रकाराची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही वादग्रस्त मागणी केली.
- मस्क, ट्रम्प व त्यांच्या समर्थकांनी वारंवार आरोप केले आहेत की, हंटर बायडेन यांच्याविषयी अडचणीत आणणारी माहिती व आक्षेपार्ह छायाचित्रे दडवून ठेवून ‘ट्विटर’ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयाला मदत केली. हंटर बायडेन याची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे व त्याविषयीची माहिती ही ट्रम्प समर्थक प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती.
‘जी-२०’च्या सोहळय़ात देशवासींना सहभागी करून घ्या:
- ‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून सर्व देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृती अवघ्या जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाच्या सोहळय़ात देशवासीयांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात दिला.
- गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असताना, भाजपने दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. २०२४ मधील लोकसभा निवडणूक तसेच, २०२३ मधील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या चिंतन बैठकीनंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय महासचिवांशीही स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात, असे समजते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रभारींनी आपापल्या राज्यांतील संघटनात्मक बांधणीचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर केला.
- ‘मिशन १४४’वर सखोल चर्चा.. भाजपने ‘मिशन १४४’चा यापूर्वीही आढावा घेतला होता. मात्र या बैठकीत केंद्रीय मंत्रीही विविध लोकसभा मतदारसंघांबाबत भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा अहवाल मांडणार आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून केंद्रीय मंत्र्यांकडे या मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. या बैठकीमध्ये ‘मिशन १४४’वर सखोल चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
६ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ५ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ४ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- ३ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- २ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
- १ डिसेंबर २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |