Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |7 February 2024
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
७ फेब्रुवारी चालू घडामोडी
अवघ्या ४१ चेंडूत मॅच खिशात, तिसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाचं निर्भेळ यश
- कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ २४.१ षटकांत ८६ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ६.५ षटकांत ८७/२ धावा केल्या आणि सामना जिंकला.
- ऑस्ट्रेलियात पूर्ण झालेला हा सर्वात लहान एकदिवसीय सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात पदार्पण करणाऱ्या झेवियर बार्टलेटसाठी ही मालिका खास ठरली. त्याने दोन सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली.
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के देण्यास सुरुवात केली. डावाच्या तिसऱ्या षटकात सलामीवीर केजॉर्न ओटली ८ धावा काढून झेवियर बार्टलेटचा बळी ठरला. यानंतर कार्टीने १० धावा आणि कर्णधार शाई होपनेही ४ धावा केल्या. १३व्या षटकात कॅरेबियन संघाला चौथा धक्का बसला आणि टेडी बिशप खाते न उघडता ४४ धावांवर बाद झाला. ॲलेक अथानाझेने काही काळ टिकण्याचा प्रयत्न केला पण मोठी खेळी खेळू शकला नाही. तो ६० चेंडूत ३२ धावा केल्यानंतर २० व्या षटकात ७१ धावांवर बाद झाला.
- विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि उर्वरित फलंदाजांमध्ये फक्त रोस्टन चेस (१२) दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला. उर्वरित फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि त्यामुळे डाव २४.१ षटकांत आटोपला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील आपली दुसरी सर्वात कमी निच्चांकी धावसंख्या नोंदवली. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेटने चार, लान्स मॉरिस आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
- लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरुवात झाली. जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिश या जोडीने चौथ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५० च्या पुढे नेली.
ऑस्ट्रेलियाचा चेंडूच्या बाबतीत सर्वात मोठा विजय
मॅकगर्कने अधिक आक्रमक वृत्ती दाखवत झटपट धावा काढण्याच्या प्रयत्नात १८ चेंडूत ४१ धावा केल्या आणि पाचव्या षटकात तो अल्झारी जोसेफचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेला ॲरॉन हार्डी काही विशेष करू शकला नाही आणि २ धावा केल्यानंतर तो ८० धावांवर ओशान थॉमसच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने ३ चेंडूत नाबाद ६ धावा करत सामना संपवला. इंग्लिशन १६ चेंडूत ३५ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने २५९ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला, जो चेंडूंच्या बाबतीतही त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये अमेरिकेविरुद्धचा सामना २५३ चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.
रस्ते, आरोग्य, सिंचनात प्रगती, औद्योगिक विकास खुंटलेलाच; भंडारा जिल्ह्य़ात २५०.७० किमी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे
- मागासलेपण आणि नैसर्गिक संसाधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी भंडारा जिल्हा रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांमुळे विकासाच्या महामार्गावर वेगाने पुढे जात आहे. विकासाला गती देण्यासाठी औद्योगिक विकासाची गरज आहे.
- वन, खनिज आणि जलसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. गोसेखुर्दसारखा महाकाय जलप्रकल्प, उपसासिंचन योजना, मँगनीजचा भरमसाट साठा, वन आणि जलपर्यटन, कृषी व मत्स्य उत्पादन क्षमता ही जिल्ह्याची बलस्थाने आहेत. एकेकाळी ‘धानाचे कोठार’, ‘तलावांचा जिल्हा’ आणि ‘पितळ उद्योगाचे माहेरघर’ अशी बिरुदे मिरवणाऱ्या जिल्ह्यात धान खरेदीतील भ्रष्टाचार, तलावांच्या देखरेखीचा अभाव आणि मूठभर लोकांच्या हाती केंद्रित झालेला पितळ उद्योग यामुळे जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर नवीन वाटा शोधणे गरजेचे झाले आहे.
- मागील काही वर्षांत दळणवळण, रस्ते यात कमालीची प्रगती झाली आहे. कधीकाळी एकमेव पूल असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील दोनच वर्षांत रोहा, आंभोरा आणि पूर्णत्वास येत असलेला कोरंभी अशा तब्बल तीन पुलांची भर पडली. साकोली व लाखनी शहरातून जाणारे उड्डाणपूल, भंडारा शहराला मिळणारे दोन वळण मार्ग, खात रोड ते रामटेक (जि. नागपूर) जवळील घोटिटोक येथे राष्ट्रीय महामार्ग ७५६ ला जोडणारा काँक्रीट महामार्ग यामुळे दळणवळण सोयीचे झाले आहे. मात्र काही राष्ट्रीय महामार्ग रखडलेले असून निलज-पवनी ते भंडारा रा. महा. ४७, गोंदिया तुमसर जांब मार्गे रामटेकला जाणारा राज्यमार्ग ७५६ आणि प्रस्तावित भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही रखडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५०.७० किमीचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणलेले आहे.
- गोसेखुर्दसारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पामुळे सिंचन आणि जलपर्यटन हे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात. जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गोसेखुर्द धरणामुळे जिल्ह्याची ‘सुजलाम् सुफलाम्’ होण्याकडे वाटचाल आणि पर्यायाने सिंचनासाठी सुविधांचा वाढता आलेख समाधानकारक असला तरीही प्रत्यक्ष सिंचन वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्यात वैनगंगा ही प्रमुख नदी असून वाघ, गाढवी, पांगोली, चुलबंद, सूर, बावनथडी या उपनद्या आहेत. जिल्ह्यात सरासरी १४०० मि.मी. पर्जन्यमान व लहान-मोठे ८२ प्रकल्प असूनसुद्धा प्रत्यक्ष सिंचनाची टक्केवारी मात्र ५३ टक्के आहे. जिल्ह्यात २ लाख ७ हजार लागवडीयोग्य क्षेत्र असून प्रत्यक्ष एकूण सिंचन मात्र १ लाख १६ हजार ७२१ हेक्टर जमिनीला उपलब्ध आहे. मात्र नेरला उपसासिंचनचे पाणी लिफ्टद्वारे बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे लाखनी तालुक्यातील मरेगावपर्यंत पोहचली आहे. या उपसासिंचन योजनेने ११६ गावांना सिंचनाखाली आणले आहे, जे यशाचे गमक आहे. जिल्ह्यातील उर्वरित सिंचन योजना पूर्णत्वास गेल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
“मुंबई रेसकोर्सवर ३२० एकरचं आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क होणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
- महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क विकसित करण्यात येणार आहे. परंतु, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या थीम पार्कबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला होता. तर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्ताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त साधलेल्या संवादात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
- मुंबई रेसकोर्सवर काय होणार? असा प्रश्न आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई रेसकोर्सवर मुंबईकरांसाठी एक खूप मोठं आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्याचा सरकारचा मानस आहे. रेसकोर्सही कायम राहील. पण मुंबईत तुम्हाला कुठे एवढं मोठं गार्डन मिळणार? आम्ही त्यांच्याकडे १२० एकर जमीन मागितली आहे. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाईल. ते ऑक्सिजन हब असेल एकप्रकारे. मुंबई देशात नाही, जगात पहिल्या क्रमांकावर असायला हवी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे सेंट्रल पार्क लोकांसाठी वरदान असायला हवं.
- “लालफितीमध्ये कामं अडकणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असतो. त्यामुळे एकल खिडकी योजना आपण चालू केली. मध्ये युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक घडामोडींचे परिणाम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अनेकांना भोगावे लागतात. पण या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून नियोजन केलं जातं. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी सोडला आहे. नीती आयोगाच्या लोकांनी मुंबई-एमएमआरमध्ये खूप क्षमता आहे असं सांगितलं. या भागातच १ ट्रिलियनचं लक्ष पूर्ण होऊ शकेल असं सांगितलं. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
- “मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात आधी पालिका आयुक्तांना बोलवलं. त्यांना सांगितलं की हे शहर खड्डेमुक्त झालं पाहिजे. काय अडचण आहे त्यात? आम्ही पहिला निर्णय घेतला तो म्हणजे रस्त्यांचं काँक्रिटीकरण. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्याचं काम मार्गी लागतंय. पुढच्या अडीच वर्षांत मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त पाहायला मिळेल. या प्रकल्पांमुळे एमएमआरचा मेकओव्हर होईल. आर्थिक विकासाचं एक नवीन केंद्र उदयाला येईल”, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं.
ज्ञानवापी मशीद प्रकरणी आजही सुनावणी
- ज्ञानवापी मशीद संकुलाच्या तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. मात्र, ही सुनावणी पूर्ण झाली नसून ती बुधवारीही सुरू राहील असे न्या. रंजन अग्रवाल यांनी सांगितले.
- मंगळवारी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या. मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने शुक्रवारी उच्च न्यायालयात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. मात्र, त्यावर तातडीने कोणताही आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला होता. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पूर्ण न झाल्याने आता ती बुधवारी सकाळी १० वाजता पुढे सुरू होईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
- मशीद समितीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एस एफ ए नक्वी यांनी न्यायालयाला सांगितले की, जिल्हा न्यायालयाच्या मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या ३१ जानेवारीच्या आदेशाने सुरुवातीलाच अंतिम निर्णय देऊन टाकला आहे, ज्याला परवानगी देता येणार नाही. हा निकाल अतिशय घाईने, म्हणजे संबंधित न्यायाधीशांच्या निवृत्तीच्या दिवशी देण्यात आला होता असा आक्षेपही नक्वी यांनी नोंदवला.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
- गेल्या काही वर्षांत महिलांनी विविध क्षेत्रात क्रांती केली आहे. पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. लष्करीसेवेतही महिलांनी नाव उंचावलं आहे. तसंच, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातही ४१ हजार ६०६ महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून दिली. यामुळे या क्षेत्रातही महिला आता आपलं करिअर घडवू शकणार आहेत. बिझनेस स्टॅण्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (Central Arm Police Force) केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल, सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीला प्रोत्साहन देण्याकरता मंत्रालयाकडून पावले उचलली जात आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भातील लेखी माहिती सभागृहाला दिली.
- या संबंधित खात्यात भरती असल्याची माहिती देण्याकरता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहीरात केली जात असल्याचंही ते म्हणाले. “सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत CAPF मध्ये भरतीसाठी सर्व महिला उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) मध्ये शिथिलता देण्यात आली आहे”, असंही नित्यानंद राय म्हणाले.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ६ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
- ५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
- ४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
- ३ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
- २ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |