जन्म :- १५ ऑगस्ट १८७२
मृत्यू :- ५ डिसेंबर १९५०
आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी.

जन्मस्थान :- कलकत्ता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात.
वडिलांचे नाव :- कृष्णधनबाबू हे प्रख्यात डॉक्टर होते.

मुलांना संपूर्णपणे पाश्चात्त्य धर्तीवर शिक्षण द्यावे, म्हणून त्यांनी अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठविले. अरविंद हे असामान्य बुद्धीचे विद्यार्थी होते. तेथील परीक्षांत त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. लॅटिन, ग्रीक, इंग्रजी ह्या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते.


फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. भारतात आल्यावर त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा छंद होता. लॅटिन, ग्रीक, इंग्रजी व बंगाली भाषांत त्यांनी कविता केलेल्या आहेत. आय्. सी. एस्. ची परीक्षा ते ग्रीक आणि लॅटिनमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले तथापि अश्वारोहणात ते अपेशी ठरले. नंतर दुसरी संधी मिळूनही ते आय्. सी. एस्. ला बुद्ध्याच बसले नाहीत.

केब्रिजला असताना ते तेथील ‘इंडियन मजलिस’ चे सचिव होते आणि त्यांनी मजलिसमध्ये क्रांतिकारक भाषणे करून भारताने सशस्त्र उठाव करूनच स्वातंत्र्य मिळवावे, असे प्रतिपादन केले. इंग्रज सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन ते १८९३ मध्ये भारतात परतले व बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले.

बडोद्यास ते १९०७ पर्यंत होते.
१९०१ मध्ये त्यांचा मृणालिनी देवींशी विवाह झाला. पुढे अरविंद पाँडिचेरीस निघून गेल्यानंतर मृणालिनी देवींचे त्यांच्या माहेरी निधन झाले.

बडोदा महाविद्यालयात प्रथम ते फ्रेंच आणि इंग्रजीचे प्राध्यापक, नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नंतर प्राचार्य होते.
बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पुढील कार्याची साधना केली. योगसाधनाही ते करीत होतेच. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून ते इंग्रजीत कविता, नाटके व निबंध लिहू लागले. देश स्वतंत्र झाला पाहिजे, सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळेल, भारताचा पुनर्जन्म झाला पाहिजे, असे ते प्रतिपादन करीत.

मुंबईच्या इंदु प्रकाश  पत्रात १८९३ पासून ते आपली राजकीय मते मांडू लागले.

बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे अरविंदबाबू एक प्रवर्तक होते. ते जहालमतवादी होते. टिळकांना ते नेते मानीत. वंगभंगाच्या वेळी ते कलकत्त्याला गेले व तेथे नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले.

कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात (१९०६) त्यांनी ‘भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य’ ह्या ध्येयाची घोषणा करून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पक्षाची उभारणी करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

सुरत काँग्रेसच्या वेळी (१९०७) त्यांनी लो. टिळकांसोबत प्रामुख्याने भाग घेतला.

राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच योगसिद्धीकडेही त्यांचे लक्ष होते. विष्णू भास्कर लेले हे त्यांचे योगमार्गातील गुरू. 

युगांतर  हे बंगाली दैनिक त्यांनी सुरू केले व बिपिनचंद्र पॉल यांच्या वंदेमातरम्  ह्या इंग्रजी दैनिकातूनही ते लिहू लागले.

वंदेमातरम्  मधील काही लेखांबाबत १९०७ मध्ये त्यांना अटक झाली पण त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही.

१९०८ मध्ये अलीपूर बाँब खटल्यात इतर ३८ क्रांतिकारकांसोबतच अरविंदबाबुंनाही तुरुंगात टाकले. सु. एक वर्ष ते तुरुंगात होते.

चित्तरंजन दास यांनी त्यांचा खटला चालवला व १९०९ मध्ये त्यांची सुटका झाली.

आपल्या बचावाच्या भाषणात चित्तरंजन दासांनी ‘राष्ट्रभक्तीचे शाहीर, राष्ट्रवादाचे प्रेषित व मानवतेचे पुजारी’ म्हणून अरविंदांच्या कर्तृत्वाचे यथोचित वर्णन केले होते.

सुटकेनंतर त्यांनी पुन्हा राजकीय आंदोलनात भाग घेतला. 

कर्मयोगी (इंग्रजी) आणि धर्म (बंगाली) ह्या नव्यानेच सुरू केलेल्या साप्ताहिक पत्रांतून ते लेख लिहू लागले.

सभा, परिषदा, दौरे सुरू करून त्यांनी वातावरण सतत तापत ठेवले. सरकार त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

१९१० मध्ये त्यांना अटक होणार असे कळताच ते फ्रेंचांच्या अंमलाखाली चंद्रनगरला व नंतर पाँडिचेरीला निघून गेले व तेथेच शेवटपर्यंत राहिले.

१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले.
श्री व सौ. पॉल यांच्या सहकार्याने अरविंदांनी आर्य  नावाचे मासिक सुरू केले व त्यात तात्त्विक, आध्यात्मिक, धार्मिक, साहित्यिक (काव्यविषयक), संस्कृतिविषयक इ. विषयांवर अनेक लेख लिहिले. 

एसेज ऑन द गीता (१९२२), 
द सिंथिसिस ऑफ योग (१९५०), 
द आयडियल ऑफ ह्यूमन युनिटी (१९५०), 
द लाइफ डिव्हाइन (१९५१), 
द फ्यूचर पोएट्री (१९५३), 
द फाउंडेशन ऑन इंडियन कल्चर (१९५३), 
ऑन द वेद (१९५६), 
द ह्यूमन सायकल (१९६२), 
द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट (१९६४), 
द सूपर मॅन (१९६८) इ. महत्त्वपूर्ण ग्रंथांतून त्यांचे हे विविध मौलिक लेख व विचार संगृहीत आहेत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.