जन्म:मे ९, १८६६
कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू:फेब्रुवारी १९, १९१५
पुणे , महाराष्ट्र
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
संघटना:भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
वडील:कृष्ण महादेव गोखले
आई:सत्यभामाबाई कृष्ण गोखले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ – फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते.

१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला.

सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले.

शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात.

1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.

या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.

राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला.

भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली.

महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले.

गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजनीतिज्ञ होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता.

मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निष्पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता.

गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. आणि ही गोष्ट खरी होती.

इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली.

एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिशधार्जिणा होता असे म्हणता येईल.

गोखल्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व सामाजिक परिवर्तन करताना हिंसात्मक मार्गाला त्यांनी केलेला विरोध होय.

गोपाळ कृष्ण गोखले हे सरकारशी संघर्ष करण्याच्या तसेच कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या विरोधात होते कोणताही प्रश्न हिंसात्मक मार्गाने सुटणार नाही उलटपक्षी तो अधिकच गंभीर बनतो असा विचार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.

इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली.

या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते.

त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.

इ.स. १८८९ मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला.

आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले.

कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात.

१९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

कॉंग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले.

भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली.

मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली.

ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता.

ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.

नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स‘ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.

आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.