Kavikulaguru Kalidas Sanskrit University
Kavikulaguru Kalidas Sanskrit University

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर)

स्थापना :

भारताचे माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव यांनी महाराष्ट्र संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या सततच्या आग्रहाने व प्रेरणेने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांची एक सदस्यीय समिती गठीत करून संस्कृत विद्यापीठाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. डॉ. जिचकार यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचे अध्ययन करून शासनाला एक विस्तृत अहवाल सादर केला.

सदर अहवालाच्या अनुषंगाने व इतर शिक्षण शास्त्रज्ञांच्या अभ्यासाआधारे महाराष्ट्र शासनाने दि. १८ सप्टेंबर १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी महाकवी कालिदासाच्या चिरस्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. महाकवी कालिदासाच्या अभियानाने स्थापन झालेले हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे संस्कृत विद्यापीठाला १२ ब दर्जा प्राप्त झाला आहे.

उद्देश :

संस्कृत ही भारताच्या अनमोल ठेवा असणाऱ्या प्राचीन ज्ञानभांडाराच्या ज्ञानप्राप्तीची एकमेव व म्हणूनच अतिशय महत्त्वपूर्ण भाषा आहे. संस्कृत म्हणजे ज्ञानवारसा संक्रमित, संरक्षित व संवर्धित करणारी भाषा ! प्राचीन काळीही नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशी नावाजलेली विद्यापीठे भारतात होती. या विद्यापीठाद्वारेच पाणिनी, पतंजली, कौटील्य यांच्यासारखे स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या ग्रंथकर्तृत्वाच्या जोरावर चिरायु कीर्ती मिळवणारे विद्वान निर्माण झाले. हा अभिमानास्पद व तेजोमय ज्ञानवारसा जतन व वृद्धींगत करण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संशोधन हा या विद्यापीठाच्या स्थापनेचा मूळ उद्देश आहे.

विद्यापीठाची वैशिष्ट्ये :

मध्य भारतात स्थापन झालेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात असे भाषेला वाहिलेले कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. हा खरोखरीच आमच्यासाठी द्विविध अभिमानाचा विषय आहे. विद्यापीठात उच्च विद्याविभूषित तसेच भाषा अध्यापन– अध्ययन आणि संशोधनात अग्रेसर असा प्राध्यापकवर्ग आहे. याशिवाय विद्यापीठातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नेट/सेट परीक्षांकरिता मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना माजी विद्यार्थी मंडळ, महिला केंद्र, हस्तलिखीत केंद्र, क्रीडा विभाग, रोजगार आणि समूदेशन केंद्र इत्यादी विविध केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते.

संस्कृत या प्राचीन भाषेचे विद्यापीठ आपल्या विद्यापीठात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात देखील अग्रेसर आहे. रामटेक या ग्रामीण परिसरात असूनही नागपूर-रामटेक हे भौगोलिक अंतर कमी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ऑडिओ व्हिजुअल साधनांचा उपयोग केला जातो. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे विविध सभा, अध्यापन केले जाते. विजेची बचत करण्यासाठी विद्यापीठामध्ये सोलर सिस्टीमचा वापर केला जातो.

विद्यापीठात स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. या विभागातर्फे आतापर्यंत संस्कृत भाषा, विविध शास्त्रांवरील ५६ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विद्यापीठाने संस्कृत भाषेतून केलेली बालसाहित्याची निर्मिती ही विशेषत्वाने दखल घ्यावी अशी आहे. विद्यापीठाद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, तसेच संशोधनासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांना संशोधन शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे दरवर्षी बैद्यनाथच्या सहकार्याने ‘महाकवी कालिदास संस्कृत– व्रती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जातो. ज्या विद्वज्जनांनी संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार, विकास तसेच संशोधनासाठी आयुष्यभर सेवा केली त्यांच्या यथोचित गौरव व्हावा हा प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यामागचा उद्देश आहे. समाजात संस्कृत भाषेला गौरवमय स्थान मिळवून देण्यात ज्यांनी अमूल्य योगदान प्रदान केले अशा महान विभूतीला महाकवी कालिदास संस्कृत- व्रती पुरस्कार विद्यापीठाकडून दिला जातो.

अभ्यासक्रम :

संस्कृत विद्यापीठात संस्कृत, पाली, प्राकृत, योग, आयुर्वेद, वेदांग ज्योतिष, भारतीय संस्कृती आणि मूल्ये, हस्तलिखीतशास्त्र, कीर्तनशास्त्र, ललितकला, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता, ग्रंथालयशास्त्र, परकीय भाषा अशा विविध विषयांवर पदविका ते पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

संस्कृत विद्यापीठाने आधुनिकतेशी नाळ जोडून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. जसे कॉम्प्युटर अप्लिकेशन पदविका, पर्यावरण व्यवस्थापन पदविका इत्यादी. पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पौरोहित्य तसेच कीर्तनशास्त्र या विषयांवरील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच केंद्रीय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करवून घेणारे सिव्हील सर्व्हीसेस पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठात उपलब्ध आहे. किंबहुना असे सृजनशील अभ्यासक्रम राबविणारे संस्कृत विद्यापीठ हे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव आहे.

विद्यापीठातील विविध पाच प्रमुख संकायांतर्गत आठ विविध विभागाद्वारे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा परिचय करून देणारे सर्वांगसुंदर असे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी मिळून सुमारे ८० अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय संस्कृत तसेच साहित्य, व्याकरण, दर्शन, योगशास्त्र, शिक्षणशास्त्र, वेदांग ज्योतिष या विषयांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे आचार्य पदवी व डीलिट करण्याची सोयही विद्यापीठात उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांबरोबरच संस्कृत शिक्षक घडविण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे स्वतंत्र बी.एड. महाविद्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृत विषयाचे शिक्षक घडविणारे हे एकमेव महाविद्यालय आहे हे विशेष !

विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने दर्जेदार कार्य केले आहे. उच्च दर्जाचे आणि नाविन्यपूर्ण तसेच समाजाभिमुख संशोधन करण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सर्वसोयींनी युक्त ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय ऑनलाईन ग्रंथालयसेवाही पुरविण्यात येत आहे.

कार्यक्षेत्र :

संस्कृत विद्यापीठाला संपूर्ण भारतात व भारताबाहेर शैक्षणिक संस्थांना संलग्नीकरण देण्याचा अधिकार आहे. संस्कृत विद्यापीठाशी आज घडीला ३४ महाविद्यालये संलग्न असून २१ एमओयु केंद्र अस्तित्वात आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या तीन हजाराहून अधिक आहे. जागतिक शिक्षणपद्धतीत अस्तित्वात असलेली श्रेयांक श्रेणीपद्धती (क्रेडीट सिस्टीम) आणि सेमीस्टर पद्धती विद्यापीठाने स्वीकारलेली आहे.

विस्तार :

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात प्रशासकीय कामकाज रामटेक येथील प्रशासकीय भवन येथून चालते. आस्थापना, सामान्य प्रशासन, वित्त, संशोधन विभाग, विद्यापीठ नियोजन व विकास मंडळ, अभियांत्रिकी, सांख्यिकी, जनसंपर्क इत्यादी विविध प्रशासकीय विभाग रामटेक येथे कार्यरत आहेत. विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य नागपूर सुधार प्रन्यास संकूल, मोरभवन जवळ, सीताबर्डी, नागपूर येथून चालते. विद्यादानाचे तसेच आनुषंगिक सर्व शैक्षणिक कार्य हे नागपूर येथे संपन्न होते. विद्यापीठाचा परीक्षा विभाग नागपूरस्थित बजाजनगर येथे कार्यरत आहे. परीक्षेसंबंधीचे सर्व कार्य पार पाडले जाते.

संपर्क :

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी अनुक्रमे रामटेक ०७११४– २५५७४७, २५५७८७, २५५७४८ नागपूर ०७१२– २५४२९३२ येथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. याशिवाय अधिक माहितीसाठी संस्कृत विद्यापीठाच्या www.kksanskrituni.digitaluniversity.ac.in या वेबसाईला भेट द्यावी.

Source: https://www.mahanews.gov.in

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *