संभाजी शिवाजीराजे भोसले
संभाजी शिवाजीराजे भोसले
पूर्ण नावसंभाजी शिवाजीराजे भोसले
जन्म१४ मे , १६५७ पुरंदर किल्ला , पुणे
अधिकारकाळ जानेवारी १६८१ – मार्च ११ , १६८९
राज्याभिषेकजानेवारी १६८१
राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण , सह्याद्री डोंगररांगापासून नागपूरपर्यंत उत्तर महाराष्ट्र , खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
पत्नी येसूबाई
उत्तराधिकारीराजाराम
चलनहोन , शिवराई (सुवर्ण होन , रुप्य होन)
मृत्यू११ मार्च , १६८९ वढू (पुणे)
संभाजी शिवाजीराजे भोसले

लहानपण:

संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले

छत्रपती: १६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळीलरामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे– गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

दगाफटका

१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातसंगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

शारीरिक छळ व मृत्यू

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.

अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. “दीन दीन” “अल्लाहो अकबर” च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ‘हलाल’ करीत शिर चिरत धडावेगळे केले !

मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

  छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची-

  1. छावा – शिवाजी सावंत – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  2. संभाजी – विश्र्वास पाटील – मेहता पब्लिशिंग हाउस
  3. शिवपुत्र संभाजी – डॉ. कमल गोखले – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  4. छत्रपती संभाजी – वा. सी. बेंद्रे
  5. मराठ्यांची धारातीर्थे – प्रवीण व. भोसले – नरसिंह पब्लिकेशन्स
  6. शंभूराजे – प्रा. सु. ग. शेवडे – धर्मसेवा प्रकाशन
  7. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज – अरुण जाखडे – पद्मगंधा प्रकाशन
  8. रौद्र – प्रा. नितीन बानगुडे पाटील

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.