लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख

टोपण नाव :- लोकहितवादी
जन्म :- १८ फेब्रुवारी १८२३
मृत्यू :-९ ऑक्टोबर १८९२
पत्नीचे नाव :- गोपिकाबाई

अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक

मूळ नाव :- गोपाळ हरी देशमुख.
जुने आडनाव :- सिद्धये.
मूळ घराणे :- रत्नागिरी

गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले.

१७५४ साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे आपल्या तीन बंधूंसह पुण्यास आले आणि पेशव्यांच्या सेवेत राहिले.

गोविंदरावांचे पुत्र आणि गोपाळरावांचे वडिल हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले ह्यांच्याकडे फडणीस होते.

बापू गोखले अष्टीच्या लढाईत पतन पावल्यानंतर हरिपंत हे दुसरे बाजीराव पेशवे ह्यांचे वकील म्हणून पुण्यात राहिले.

हरिपंतांच्या चार पुत्रांपैकी गोपाळराव हे क्रमाने तिसरे.
वयाच्या सातव्या वर्षी गोपाळरावांचे लग्न झाले.
त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई. गोपाळराव तेरा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.

१८४६ साली ते मुन्सफीची परीक्षा उत्तीर्ण झाले.

१८५२ मध्ये वाई (जि. सातारा) येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून त्यांची नेमणूक झआली.

१८५३ मध्ये ‘ॲक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन’ आणि सातारा येथील अदालतीचे प्रमुख म्हणून काही महिने त्यांनी काम पाहिले.

१८५५ मध्ये पुणे येथे उत्तर विभागाचे ‘सब-असिस्टंट इनाम कमिशनर’ म्हणून ते नेमले गेले.

पुढे १८६१ साली हिंदू व इस्लामी कायद्यांचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले.

१८८४ मध्ये रतलाम संस्थानचे दिवाणपद त्यांनी स्वीकारले. तेथे ते वर्षभर होते.

थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर.

 ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली.

भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर नामक पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली.

ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत.

समारोपाचे शंभरावे पत्र (निबंध) लिहिल्यानंतर आणखी शंभर निबंध लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता. तथापि हे निबंध प्रभाकरातून प्रसिद्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी पहिल्या शंभर पत्रांत आठ निबंधांची भर घालून ‘अष्टोत्तरशतपत्रे’ पूर्ण केलेली दिसतात.

१८६६ साली जो लोकहितवादीकृत निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला, त्यात ह्या ‘अष्टोत्तरशतपत्रां’ खेरीज त्यांनी लिहिलेल्या अन्य निबंधांचाही समावेश करून एकूण १९५ निबंध प्रसिद्ध करण्यात आले होते.

इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्त्वाचे लाभ आहेत, ह्याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती, तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीचीही होती.

ज्यांना मूर्ख आणि टोणपे म्हणता येईल, असे इंग्रज अधिकारीही येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे.

ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.

इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील लोकांना मोठी अधिकारपदे देत नाहीत, अशी तक्रार होती.

मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकराण्याची पात्रता येथील लोकांत आली, की इंग्रज सरकार ह्या धोरणात निश्चितपणे बदल करील, अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशीची  चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. ‘… आपले लोक कापडे जाडी, वाईट करतात परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करितात, त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे.

विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती.

विद्यावृद्धी आणि ग्रंथनिर्मिती ह्यांच्यातील नाते अतूट आहे म्हणूनच उत्तम शिक्षक आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत, हे सांगून ‘मराठी पंतोजी तयार करण्याची येक शाळा केली पाहिजे व चांगले ग्रंथ तयार करण्याकरिता तर्जुमे करणाऱ्यांची एक मंडळी बसविली पाहिजे’, असे लोकहितवादींनी कित्येक वर्षांपूर्वी सुचविले.

इतिहास आणि भूगोल ह्या दोन्ही विषयांच्या संदर्भात हिंदूंनी आस्था दाखविली नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. लोकहितवादींच्या काळापूर्वीच्या इतिहासाचा विचार केला, तर आपला इतिहास हा मुख्यतः पौराणिक स्वरुपाचा. काळाचे अनेक विभाग करून त्याचे चक्र निर्मावयाचे आणि त्यात अनेक अद्‌भुत कथा भरावयाच्या, अशी रीत.

‘हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशा लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत.

लोकहितवादींचे अन्य काही ग्रंथ असे :

 महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९), 
यंत्रज्ञान (१८५०), 
खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१), 
निगमप्रकाश (गुजराती, १८७४), 
जातिभेद (१८७७), 
गीतातत्त्व (१८७८). 
सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०), 
ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३), 
स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३), 
पंडितस्वामी श्रीमद्‌द्‌‌‌‌‌यानंद सरस्वती (१८८३), 
ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५), 
गुजराथचा इतिहास (१८८५).

लोकहितवादींचे खरे नाव ज्यात दिले आहे, असा त्यांनी लिहिलेला ग्रंथ उपलब्ध नाही. टोपण नावांनी त्यांनी लेखन केले.

लोकहितवादींच्या अध्ययनकाळी विद्यापीठांची स्थापना झालेली नव्हती. इंग्रजी घेण्यातही लोकांच्या सनातनीपणाचा अडथळा होता.

त्यांचे सामाजिक कार्यही त्यांचे लोकहितवादी पण सार्थ ठरविणारे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जेथे जेथे गेले, तेथे त्यांनी समाजोपयोगी संस्था निर्माण केल्या.

वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते.

पुण्याच्या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते. 

ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.

मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच. 

लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते.

अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. 

हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात.

गुजराती कवी मोहनलाल दलपतराम ह्यांनी लोकहितवादींच्या गुणवर्णनपर एक काव्य लिहिले, ही बाब लोकहितवादींची गुजरातेतील लोकप्रियता स्पष्टपणे दर्शविणारी आहे.

प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्णवर्मा ह्यांना विलायतेत शिक्षण घेता यावे, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि पुढे श्यामजींचे नाव त्यांनी रतलाम संस्थानच्या दिवाणपदासाठी सुचवले व त्याला मान्यता मिळविली.

हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या आर्य समाज आणि ‘प्रार्थना समाज’ ह्या दोन्ही पंथांशी त्यांचा निकटचा संबंध आलेला होता.

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्याविषयी लोकहितवादींना मोठा आदर होता.

मुंबई आर्य समाजाचे प्रमुखपदही काही काळ त्यांच्याकडे होते.

अहमदाबाद येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता.

तथापि ह्या दोन्ही पंथांच्या ते आहारी गेले नव्हते. 

वेदांतील मंत्रभाग हा ईश्वरप्रणीत होय, आर्य समाजाची भूमिका लोकहितवादींना मान्य नव्हती. 

वेदांना ते मानवप्रणीत मानीत होते.

त्याचप्रमाणे त्यांचा ओढा ज्ञानमार्गकडे असल्यामुळे पुढे भक्तिमार्गाकडे वळलेल्या प्रार्थना समाजाशी ते एकरुप होऊ शकले नाहीत.

लोकहितवादींच्या विचारांकडे दीर्घ काळ उपेक्षेने पाहिले गेले, त्यांचे समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी तर त्यांच्यावर अत्यंत कडवड टीका केली.

लोकहितवादींसारखे विद्वान इंग्रजांच्या विद्येने दिपून गेलेले असून स्वदेश व स्वधर्म ह्यांच्यावर टीका करून आमचा तेजोभंग करीत आहेत अशी विष्णुशास्त्र्यांची भूमिका होती.

तथापि ‘आमच्या व चिपळूणकर ह्यांच्या लेखांतील सत्यासत्यविवेचनाची शक्ती व बुद्धि ज्या विचारी लोकांकडे आहे, त्यांनीच विष्णुशास्त्र्यांना उत्तर द्यावे’ , असे  लोकहितवादींनी म्हटले होते.

स्वदेश आणि स्वधर्म ह्यांबद्दल लोकहितवादींना निश्चितच अभिमान होता परंतु तत्संबंधीच्या विधायक चिकित्सेला पारखे करणारे अंधत्व त्या अभिमानाला आलेले नव्हते. लोकहितवादींनी मांडलेल्या विचारांचे औचित्य काळानेच दाखवून दिले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.