दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतामध्ये नागरी सेवा दिन पाळला जातो.
प्रशासकीय सेवेत स्वत:ला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो.
२१ एप्रिल १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून २००६ पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे.

भारतीय नागरी सेवा (ICS) : भारतीय नागरी सेवेचे दोन भाग आहेत.
१) अखिल भारतीय सेवा : या सेवा तीन आहेत.
- i) भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
- ii) भारतीय पोलिस सेवा (IPS)
- iii) भारतीय वनसेवा (IFoS)
२) केंद्रीय सेवा: यात गट अ व गट ब यात विभागलेल्या सुमारे १७ सेवा येतात. उदा. राजस्व सेवा, पोस्टल सेवा, माहिती सेवा, व्यापार सेवा इ. नागरी सेवा दिनाचा एक भाग म्हणून दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पारितोषिके नागरी सेवकांना देण्यात येतात.